देशमाने : जगण्यासाठी शेती वाचविणे गरजेचे असून, अतिरिक्त उत्पन्नाच्या हव्यासापोटी जमिनीचा बिघडत चाललेला पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध विकास समिती सभापती संजय बनकर यांनी केले.
देशमाने येथे जागतिक मृदा दिनानिमित्त तालुका कृषी विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य नवनाथ काळे उपस्थित होते. रासायनिक खते व कीटकनाशकांचा होत असलेला वारेमाप वापर टाळून शेतीतील खर्च कमी करण्याचा सल्ला बनकर यांनी दिला. बहुपीकपद्धतीमुळे जमिनीस हवी असलेली विश्रांती मिळत नसल्याने व सातत्याने पाण्याचा अधिक वापर वाढल्याने दिवसेंदिवस जमीन नापीक बनत असून, यासाठी जमिनीत सेद्रिय कर्ब वाढविण्याची नितांत गरज असल्याचे मत तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले यांनी व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील जमीन आरोग्यपत्रिकेचे वाचन करण्यात आले. शेती आरोग्य, पाणी, माती-पाणी यांचे परीक्षण किती व का गरजेचे बनले आहे, याविषयी राजेंद्र हंडोरे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक पर्यवेक्षक भास्कर नाईकवाडे, तर सूत्रसंचालन पाटोदा कृषी मंडल अधिकारी जनार्दन क्षीरसागर यांनी केले. आभार सहायक कृषी अधिकारी रमेश वाडेकर यांनी मानले.
फोटो- देशमाने येथे जागतिक मृदा दिनानिमित्त बोलताना तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले. समवेत संजय बनकर, नवनाथ काळे आदी.
फोटो : ०५ देशमाने