ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ग्रामपंचायतीतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी स्वप्नील ठोके यांनी दिली. मालेगाव येथे वाढत्या कोरोना रूग्णामुळे ताहाराबाद ग्रुप ग्रामपंचायतीने आपल्या उपाययोजनेत तत्काळ वाढ केली आहे. ग्रामपंचायत कार्यालयात ठोके यांनी ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य, आशा, अंगणवाडी कर्मचारी यांची बैठक घेण्यात आली. या अगोदर गावात करण्यात आलेल्या सर्वेचा आढावा घेण्यात आला. पुढील काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कशा उपाययोजना करता येतील, यावर चर्चा करण्यात आली. गावातील शेवटच्या टोकावरून आलेल्या सूचना लक्षात घेऊन गावातील तीन हजार कुटुंबांसाठी सॅनिटाइझर, साबण, मास्क वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. हे सर्व साहित्य आंगणवाडी व आशासेविका यांच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचविण्याचे काम सुरु केले आहे. पुढील ३० एप्रिलपर्यंत वाढलेल्या लॉकडाउनच्या काळात नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल, असे बैठकीत ठरले. सरपंच इंदूताई सोनवणे, उपसरपंच डॉ डी.एस. महाजन, सीताराम साळवे, प्रदीप कांकरिया व ग्रामपंचायत सदस्य आदी नियमांचे पालन होते की नाही यासाठी प्रयत्नशील आहेत.
ताहाराबाद ग्रामपंचायतीतर्फे विविध उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 8:50 PM