नाशिकरोड : नांदुरनाका येथे आठ दिवसांपूर्वी पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या संशयिताला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी बंजारा समाजाच्या व इतर विविध संघटना, पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी करत आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.नांदुरनाका येथे आठ दिवसांपूर्वी बंजारा समाजाच्या पाच वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली आहे. बलात्काराच्या या घटनेच्या निषेधार्थ बंजारा समाजाच्या व इतर विविध संघटना पक्षाच्या वतीने गुरुवारी दुपारी नांदूर नाक्यापासून मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा सुरू झाल्यानंतर मुसळधार पावसाचे आगमन झाल्याने काहीकाळ मोर्चात व्यत्यय आला होता. नांदूर नाक्यापासून जेलरोड, बिटको पॉर्इंटमार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाचे नेतृत्व करणारे आमदार हरिभाऊ राठोड यांची अचानक प्रकृती खराब झाल्याने त्यांना तातडीने उपचाराकरिता दाखल करण्यात आले. जेलरोडपासून मोर्चेतील एका जीपमध्ये पीपल्स रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे सहभागी झाले होते. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चा अडविल्यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात बलात्काराच्या या निंदनीय घटनेचा तीव्र भाषेत निषेध व्यक्त केला. तसेच हा गुन्हा जलद न्यायालयामार्फत चालवून संशयिताला सहा महिन्यांच्या आत फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. मोर्चामध्ये गणेश उन्हवणे, मोरसिंग राठोड, आत्माराम जाधव, देवीदास राठोड, शशिकांत उन्हवणे, संजय अढांगळे, प्रकाश राठोड, युवराज आडे, अविनाश चव्हाण, अविनाश पवार, शोभा चव्हाण, नंदा मथुरे, मनीषा पवार, संध्या राजपुत, बळीराम राठोड, ओंकार जाधव, अशोक आल्हाट, पृथ्वीराज राठोड, बळीराम पवार आदिंसह राज्यातील राष्ट्रीय बंजारा क्रांतिदल, भारतीय बंजारा क्रांतिदल, बंजारा टायगर आदि संघटनांचे पदाधिकारी, महिला व विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
विविध संघटनांचा आक्रोश मोर्चा
By admin | Published: September 23, 2016 1:43 AM