नाशिक : आठवडाभरापासून आॅक्टोबर हिट अनुभवणाऱ्या नाशिककरांना परतीच्या प्रवासात पावसाने दमदार हजेरी लावून दिलासा दिला. रविवारी (दि.२५) दुपारी ४ वाजेपासून विजांचा कडकडाट अन् ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला शहर परिसरात सुरुवात झाली. सुमारे दोन ते तीन तास संपूर्ण शहराला पावसाने झोडपून काढले. दरम्यान, वादळी वारा सुटल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात काही ठिकाणी वृक्ष कोसळले.सप्टेंबरच्या १८ तारखेला अर्थात अखेरच्या शाहीस्नानाच्या पर्वणीच्या पूर्वसंध्येलाच पावसाने जोरदार आगमन केले होते. पर्वणीला रात्री उशिरापर्यंत पावसाचा तडाखा सुरूच होता. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने पावसाळा संपल्यात जमा झाल्याचे गृहित धरून नाशिककरांनी रेनकोट-छत्र्यांचे ‘पॅकअप’ केले; मात्र आज अचानकपणे दुपारच्या सुमारास पावसाने सलग तीन तास शहर परिसरात जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. रविवारचा दिवस असल्याने संध्याकाळी खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नाशिककरांची फजिती झाली तर काहींनी घराबाहेर पडणे टाळणे पसंत केले. दुपारी ४ वाजेपासून सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध रस्त्यांच्या करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या कामामध्ये गटारींचे चेंबरही बुजले गेल्याने पाणी वाहून जाण्यास जागा राहिली नव्हती. त्र्यंबकरोड, अशोकस्तंभ चौक, मालेगाव स्टॅन्ड, तपोवन, शालिमार, एन. डी. पटेल रोड, मायको सर्कल, तिडके कॉलनी आदि ठिकाणी पाण्याचे तळे तयार झाले होते.सुरुवातीला अर्धा तास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस होत होता; मात्र त्यानंतर वादळी वारा सुटल्याने शहरात काही ठिकाणी कमकुवत प्रजातीचे वृक्ष कोसळून वाहनांचे नुकसान झाले. तसेच काही ठिकाणी वृक्षांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याची अग्निशामक दलाच्या मुख्यालयाच्या सूत्रांकडून देण्यात आली. वृक्ष कोसळल्याच्या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. शासकीय कन्या शाळेतील वृक्ष कोसळून संरक्षण भिंतीच्या बाहेर पडल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षाचे (एमएच १५ जे २१३०) नुकसान झाले. महाकवी कालिदास कलामंदिराजवळ झाडे पडल्याने काही दुचाकींचे नुकसान झाले. गणेशवाडीतील सहजीवननगर, काठेगल्ली या ठिकाणी वृक्ष व फांद्या कोसळल्या. (प्रतिनिधी)रविवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने शासकीय कन्या शाळेच्या कम्पाउंडबाहेर रस्त्यावर पडलेले झाड.
परतीच्या प्रवासात बरसला वरुणराजा !
By admin | Published: October 25, 2015 11:34 PM