सिन्नर : आगामी लोकसभा व त्यानंतरच्या निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर करून मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शी पद्धतीने राबविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या यंत्राची प्रत्यक्ष कार्यपद्धती समजावी, यासाठी शुक्रवारपासून (दि. १५) ते दि. १९ डिसेंबरपर्यंत सिन्नर विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपमाला चौरे व तहसीलदार नितीन गवळी यांनी दिली.सिन्नर विधानसभा मतदारसंघाकरिता ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांबद्दल जनजागृती करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. मंडळ अधिकारी व तलाठी यांचा समावेश असलेल्या १० पथकांना सेंट्रल वेअर हाउस, अंबड येथे या यंत्रांच्या हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. याच पथकांकडून तालुक्यात मतदारांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. मंडळ अधिकारी प्रमुख असणारे पथक प्रत्येक मतदान केंद्राच्या क्षेत्रात (गावातील/ शहरातील) मुख्य चौक, नाका, मुख्य बाजार, शासकीय कार्यालय, सभेची ठिकाणे व मोक्याच्या जागांवर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांबद्दल माहिती देणार आहे. यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी मतदारांकडून प्रत्यक्ष मतदान करून घेतले जाणार आहे. मतदान करताना मतदाराने दिलेले मत त्यांना व्हीव्हीपॅट यंत्रात दिसणार आहे. मतदारांचे हे प्रशिक्षण व जनजागृती अभियान प्रत्यक्षातील निवडणूक मतदान प्रक्रिया सुलभ व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात उपयुक्त ठरणार असल्याची माहिती चौरे, गवळी यांनी दिली.
सिन्नरला आजपासून मतदार जनजागृती अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 6:29 PM