नाशिक: शुरवीर पिता सीआरपीएफचे कोब्रा कमांडो शहीद नितीन भालेराव यांनी दोन वर्षांपुर्वी देशसेवा करताना आपले बलिदान दिले. या धक्क्यातून भालेराव कुटुंबीय सावरत असतानाच चार दिवसांपुर्वी वीर पत्नी रश्मी भालेराव यांचेही दुर्दैवी निधन झाले अन् दोन्ही कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. अवघ्या दुसरीत शिक्षण घेणाऱ्या वेदांगीचे दोन वर्षांतच मातृ-पितृ छत्र हरपले; मात्र वेदांगीचे स्वप्न आपल्या मातापित्यांच्या स्वप्नांप्रमाणेच खुप उंच आहे. ती म्हणतेय ‘मी मोठी होऊन पापासारख्या देशाची सेवा करेल..' वडीलांप्रमाणेच देशसेवा करण्याच्या या लहानगीच्या जिद्दीला सॅल्यूट.
इंदिरानगरमधील राजीवनगर येथे राहणारे भालेराव कुटुंबीय मध्यमवर्गीय आहे. पुरूषोत्तम भालेराव हे एचएएलमध्ये नोकरीला होते. तीनही भावंडे लहान असतानाच त्यांचे निधन झाले. वीरमाता भारती भालेराव यांनी मोठ्या कष्टाने आपल्या मुलांना मोठे केले व उच्चशिक्षण दिले. दोन मुले शिक्षक असून शहीद नितीन भालेराव हे केंद्रिय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) असिस्टंट कमान्डंट म्हणून देशसेवा करत होते.
२०२० साली छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी जंगलात पेरून ठेवलेल्या आयईईडीच्या भुसुरूंग स्फोटात कर्तव्यावर असताना गस्तीदरम्यान त्यांना वीरमरण आले. गंभीररित्या जखमी होऊनदेखील २०६कोब्रा बटालियनचे ३३वर्षीय शुरवीर नितीन यांनी नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर देत आपल्या पथकाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. नक्षलवाद्यांना हत्यारांची लूट करू दिली नव्हती. त्यांचे निधनाचा मोठा धक्का त्यांच्या पत्नी रश्मी भालेराव यांना बसला होता. भालेराव कुटुंबीयांसह पुर्वाश्रमीच्या कुटुंबियांकडून त्यांना या धक्क्यातून सावरण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात होता; मात्र त्यात अपयश आले. शनिवारी (दि.११) हृदयविकाराच्या झटक्याने रश्मी यांचे निधन झाले.
‘सीआरपीएफ’कडे आर्थिक मदतीची मागणी
सीआरपीएफ’मध्ये शहीद नितीन भालेराव यांचे सहकारी असलेले विविध अधिकारीवर्गाने मिळून सीआरपीएफचे नेतृत्व करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वेदांगीला आर्थिक मदतीचा हात देण्याची मागणी केली आहे. या दु:खाच्या प्रसंगात वेदांगीसह भालेराव कुटुंबियांसोबत उभे राहत सीआरपीएफ वाइव्ज वेल्फेअर असोसिएशनने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
आम्ही दादा-वहिनीला वेदांगीमध्ये बघतो. वेदांगीचे स्वप्न मोठे असून तिला अंतराळवीर व्हायचे आहे. आमच्या भावालाही वाटत होतं की तिने उच्चशिक्षण घेत प्रशासकिय सेवा किंवा पोलिस सेवेत दाखल होत देशसेवा करावी. वेदांगीच्या स्वप्नपुर्तीसाठी आम्ही भावला तेव्हाही शब्द दिला होता ‘तु काळजी करु नकोस, मी आहे’ तो शब्द मी पाळणार आहे. सीआरपीएफकडून एकच अपेक्षा आहे की त्यांनी वहिनीच्या पेन्शनसह वैद्यकिय, शैक्षणिक सुविधांचा लाभ वेदांगीला द्यावा. -सुयोग भालेराव.