पंचवटी : दान, क्रोध, श्रद्धा व सत्य याचे लहानपणापासून शिक्षण दिले तर वेदांची परंपरा टिकून राहील. वैदिकांबद्दल श्रद्धा बाळगायला हवी. कोणत्याही प्रकारचे कर्म करताना वेदांचा संबंध येतोच. आज वेदांची परंपरा लुप्त होत चालली असून, भविष्यात वेदांचे संरक्षण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वाराणसी येथील पंडितराज गणेशशास्त्री द्रविड गुरुजी यांनी केले.
सरदार चौकातील शंकराचार्य मठात महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान यांच्यावतीने कोरोना महामारी संकट दूर व्हावे, यासाठी वेद पाठशाळेने त्र्यंबकेश्वर, सिद्धिविनायक, विठ्ठल रूक्मिणी मंदिर, पंढरपूर याठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत चार वेदांचे वैदिक विद्वान बोलावून पारायण केले. त्याची सांगता म्हणून वेदपठण व भारतातील श्रेष्ठ वैदिक चारही वेदांच्या विद्वानांचा गणेशशास्त्री यांच्या हस्ते स्व. धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय वेद पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी गणेशशास्त्री म्हणाले की, ब्रह्म म्हणजे वेद होय. ब्राह्मणांनी व्यवस्थित अध्ययन केले नाही, तर समस्या निर्माण होतात. वैदिकांचा पाठ बरोबर आहे. त्याचे लेखन करणे गरजेचे आहे. सर्व जण वेद शिकत नाहीत; परंतु प्रत्येकाला वेदाची गरज आहे, असेही ते शेवटी म्हणाले.
जोपर्यंत ब्रह्म आहे तोपर्यंत वेदवाणी आहे. सामवेद, यजुर्वेद नष्ट होण्याच्या मार्गावर आले होते; परंतु ते नष्ट झाले नाहीत. तोंड, डोळे, कान हे वेदांचे अंग असून, ते टिकले तरच वेद टिकतील, असे प्रतिपादन सत्काराला उत्तर देताना वेदाचार्य दिनकर भट्टा फडके यांनी केले.
यावेळी ऋग्वेद वेदाचार्य दिनकर फडके, यजुर्वेद वेदाचार्य लक्ष्मीकांत दीक्षित, सामवेद वेदाचार्य कृष्ण पळसकर, अथर्ववेद वेदाचार्य श्रीधर अडी गोकर्ण यांना शाल व श्रीफळ महावस्त्र व स्मृतिचिन्ह देऊन स्वर्गीय धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेदमूर्ती रवींद्र पैठण यांनी केले. यावेळी वेद पारायणाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला सतीश शुक्ल, रामगोपाल अय्यर, वैभव मांडे, श्याम भटमुळे, वासुदेव ठोसर, मुकुंदाचार्य, विनय त्रिपाठी, उपस्थित होते.