नाशिक : शिवसेनेत खांदेपालट झाला असला तरी, या परिवर्तनामुळे शिवसेनेतील अस्वस्थता काही कमी झालेली नाही. त्याचे प्रत्यंतर बुधवारी (दि. २८) नवनियुक्त महानगरप्रमुखांनी बोलावलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत आले. प्रभाग १३ च्या पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी महानगरप्रमुख सचिन मराठे व महेश बडवे यांनी बोलावलेल्या बैठकीला ३५ पैकी अवघ्या सात नगरसेवकांनी हजेरी लावल्याचे समजते. नगरसेवकांनी महानगरप्रमुखांनी बोलावलेल्या बैठकीकडे पाठ फिरविल्याने सेनेतील अस्वस्थता आणखी चर्चेत आली आहे. महानगर शिवसेनेत काही दिवसांपूर्वीच फेरबदल करण्यात येऊन महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना हटवण्यात आले. त्यांच्या जागेवर नाशिक पूर्व आणि पश्चिम मतदारसंघासाठी माजी नगरसेवक सचिन मराठे, तर पंचवटी आणि नाशिकरोड-देवळालीसाठी महेश बडवे यांची महानगरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतर पदग्रहण सोहळ्याला जुन्या शिवसैनिकांचीही हजेरी लागल्याने सेनेत चैतन्याचे वारे संचारल्याचे वातावरण तयार झाले. दरम्यान, प्रभाग १३ मधील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजपाने सर्व नगरसेवकांची बैठक बोलावत बूथनिहाय नियोजन केले असताना, शिवसेनेच्या दोन्ही महानगरप्रमुखांनीही पक्षाच्या सर्वच्या सर्व ३५ नगरसेवकांना पोटनिवडणुकीच्या तयारीसाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता बोलावलेल्या बैठकीला निमंत्रित केले. परंतु, साडेबारा वाजले तरी नगरसेवकांचा मागमूस दिसेना. त्यामुळे उपस्थित राहिलेल्या सात नगरसेवकांमध्येच बैठकीचा उपचार पार पाडण्यात आल्याचे समजते. बैठक आटोपल्यानंतर दोन नगरसेवकांची भर पडली. ३५ नगरसेवक असूनही अत्यल्प उपस्थिती लावल्याने सेनेतील अस्वस्थता त्यानिमित्ताने चर्चेत आली आहे.सहाणे हकालपट्टीमुळेही गट-तटशिवसेनेचे माजी नगरसेवक व गेल्यावेळचे विधानपरिषदेचे उमेदवार शिवाजी सहाणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर काही ठरावीक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद बोलावत सहाणे यांनी केलेल्या आरोपांचे खंडण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, याबाबत काही पदाधिकाºयांनी सोईस्कररीत्या मौन पाळले. त्यामुळे सहाणे यांच्या हकालपट्टीवरूनही पक्षात गट-तट पडल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
वेडात वीर ‘मराठे’ दौडले ‘सात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:53 AM