सटाणा : बागलाण तालुक्यातील वीरगाव शिवारातील सालदाराने उचल बुडविण्याच्या इराद्याने मालकाचे संपूर्ण कुटुंब संपविण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या माठात विषारी औषध टाकण्याचा प्रयत्न केला. सदर माठातील पाणी मालकाच्या मुलाने पिल्याने त्याची प्रकृती चिंताजनक झाली आहे. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी एकाला अटक केली असून, या प्रकाराने बागलाण तालुक्यात खळबळ उडाली आहे.वीरगाव येथील शेतकरी त्र्यंबक विष्णू देवरे (वय ६४, श्रावणे शिवार) यांच्या शेतात देवीदास संतोष मोरे (रा.वीरगाव) हा सालदार म्हणून काम करत होता. त्याने देवरे यांच्याकडून उचल म्हणून ५० हजार रुपये घेतले होते. मुदत संपूनही मोरे याने उचल घेतलेली रक्कम परत केली नाही म्हणून देवरे यांचा मोरेकडे पैशांसाठी पाठपुरावा सुरू होता. देवरे यांच्या सततच्या तगाद्याने मोरे याने ५० हजार रुपये बुडविण्याच्या उद्देशाने देवरे कुटुंबीयांना संपविण्याचा कट रचला. देवरे यांच्या घराच्या मागील बाजूच्या भिंतीवरून उडी मारून घरात प्रवेश केला. देवरे कुटुंबीयांना संपविण्याच्या इराद्याने त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या माठात विषारी औषध मिसळून पोबारा केला. शेतकरी देवरे यांचा मुलगा योगेश त्र्यंबक देवरे (वय ३२) याने माठातले पाणी पिल्याने त्याला उलट्या होऊ लागल्या. देवरे कुटुंबीयांनी सालगडी देवीदास मोरे यांच्यावर संशय व्यक्त केल्याने सटाणा पोलिसांनी मोरे याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच गुन्हा कबूल केल्याचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी सटाणा पोलिसांत फिर्याद दिली असून, पोलिसांनी आरोपी देवीदास मोरेवर जीवे मारण्याचा प्रयत्न म्हणून कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
वीरगावला सालदाराने कालवले मालकाच्या पाण्यात विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 11:39 PM