नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात होणाऱ्या बदलाचा फटका भाजीपाल्यासह इतर पिकांना बसत आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या थंडीमुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाव वाढले आहेत.
टोमॅटोचे २० किलोचे कॅरेट २५० ते २२५० रुपयांपर्यंत, तर वांग्याचे कॅरेट १५०० ते २७५० रुपयांपर्यंत विक्री केले जात आहे. कोथिंबिरीच्या १०० जुड्या २००० ते २७०० पर्यंत विक्री होत आहेत. मेथीच्या १०० जुड्या ८०० ते १६०० रुपयांपर्यंत विक्री होत आहेत. शेपूच्या १०० जुड्यांना ९०० ते २३०० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याची माहिती नाशिक बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
डाळिंबाच्या भावात घसरण सुरूच आहे. कांद्याच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत असून, त्यामुळे उत्पादक हवालदिल झाले आहेत. बागलाण तालुक्यात गुरुवारी कांद्याला किलोमागे केवळ ४० पैसे भाव मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला होता.