पंचवटी : टमाटा, वांगे, फ्लॉवर, कोबी या फळभाज्यांपाठोपाठ मेथी, शेपू आणि कांदापात या पालेभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. बाजार समितीत ४० टक्क्यांपर्यंत पालेभाज्यांची आवक घटल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले. दरवर्षी जून महिन्याच्या प्रारंभापासून सर्वच प्रकारच्या पालेभाज्यांची आवक घटत असते. बाजारात फळभाज्या व पालेभाज्या विक्रीसाठी येत असल्या, तरी आवक कमी प्रमाणात असल्यामुळे त्याचा परिणाम बाजारभावावर जाणवत आहे. मागणीत वाढ झाल्याने व त्यातच स्थानिक बाजारपेठेसह परजिल्ह्यातील बाजारपेठेत शेतमालाची आवक घटल्यामुळे बाजारभाव तेजीत आले आहेत. बाजार समितीत सध्या दैनंदिन ५५ ते ६० टक्के इतकाच शेतमाल विक्रीसाठी दाखल होत असून, ग्राहकांना पालेभाज्या खरेदी करताना खिशाचा विचार करावा लागत आहे. गेल्या आठवडाभरापासून शहरात पालेभाज्यांचे दर तेजीत आल्याने ग्राहक हवालदिल झाले आहेत. सध्या पावसाळा सुरू झाला असून, पावसाने दमदार हजेरी लावली तर शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होऊन आवक घटली जाऊन बाजारभाव आणखी तेजीत येण्याची शक्यता व्यापारी वर्गाने वर्तविली आहे. (वार्ताहर)