पंचवटी : संपूर्ण देशात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने त्याचा सर्व उद्योगधंदे, व्यवसाय, शेती व अन्य घटकांवर परिणाम झाला आहे. तसाच परिणाम शेतमालावरही झाला असून, त्यामुळे नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक साधारणपणे ५० टक्के घटली आहे. परिणामी मुंबई उपनगरातदेखील नेहमीपेक्षा निम्माच माल दैनंदिन रवाना होत आहे.नाशिकच्या बाजार समितीतून मुंबईत मोठ्या प्रमाणात शेतमाल पाठविला जातो, मात्र मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात असल्याने वाशी बाजार समिती काही दिवसांपासून बंद करण्यात आली आहे त्यामुळे केवळ मुंबई उपनगरात शेतमाल पाठविला जात आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून रोज किमान १०० चारचाकी भरून शेतमाल रवाना केला जायचा, मात्र आता केवळ कमीत कमी ५० वाहने शेतमाल पाठविला जात आहे. बाजार समितीत नाशिक जिल्ह्यातील व धुळे, नगर, जळगाव यांसह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथील वाटाणा, गाजर, बटाटा असा शेतमाल दाखल होत आहे.लॉकडाउनमुळे वाशी बाजार समिती बंद असली तरी मुंबई उपनगरांत शेतमाल दाखल होत असल्याने मुंबईत रोज शेतमालाचा पुरवठा होत आहे. बाजारभावदेखील मध्यम असून, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कोबी, फ्लॉवर व अन्य पालेभाज्या मुंबई उपनगरात विक्रीसाठी नेत असल्याने नाशिकच्या बाजार समितीत आवक घटली आहे, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
भाजीपाल्याची आवक ५० टक्क्यांनी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 9:54 PM