नाशिक : शहरातील विविध ठिकाणी असलेले भाजीबाजार मोबाइल चोरट्यांचे हक्काचे ठिकाण बनल्याचे वाढत्या मोबाइल चोरीच्या घटनांमुळे समोर आले आहे़ ताजा व स्वस्त भाजीपाला मिळत असल्याने नागरिक भाजीबाजारातील खरेदीला प्राधान्य देतात़ मात्र, या ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या मोबाइल चोरट्यांच्या टोळ्या नागरिकांच्या खिशातून अलगद मोबाइल चोरून नेतात़ विशेष म्हणजे भाजी विक्रेत्यास या चोरट्यांची पुरेपूर माहिती असून केवळ दहशतीपोटी ते आपले तोंड बंद ठेवतात, तर दुसरीकडे चोरीऐवजी गहाळची नोंद केली जात असल्याने चोरट्यांचेही फावते़पंचवटी व सिडको परिसरातील भाजीबाजारात मोठ्या संख्येने मोबाइल चोरीच्या घटना घडतात़ या ठिकाणी भाजी खरेदीत व्यस्त असलेल्या नागरिकावर चोरट्यांचे बारीक लक्ष असते़ त्याच्याभोवती तीन-चार चोरटे गर्दी करून दाटीवाटीने उभे राहतात़ त्यापैकी एक अलगद मोबाइल लंपास करतो व चोरलेला मोबाइल हा हातोहात दुसऱ्या साथीदाराकडे पार्सल करतो़ यामुळे चोरटा पकडला गेला तरी त्याच्याकडे मुद्देमाल सापडत नाही व नाइलाजाने त्यास सोडून द्यावे लागते़शहरातील फुलेनगर तसेच सिडको परिसरात मोबाइल चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. भाजीबाजार, आठवडे बाजार, उपनगरातील मुख्य चौकातील बाजार व इतर बाजारपेठेत मोबाइल चोरट्यांचा मुक्तसंचार आहे. चोरट्यांनी गतवर्षी एक हजाराहून अधिक नागरिकांचे महागडे मोबाइल चोरून नेले आहेत़ पोलिसांनी आतापर्यंत पकडलेल्या मोबाइल चोरट्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आढळून आला आहे़ मोबाइल चोरी करताना अल्पवयीन मुले पकडली गेली तरी पोलिसांकडून त्रास वा न्यायालयाकडून शिक्षा होत नसल्याची बाब या टोळ्यांच्या म्होरक्यांना चांगलीच ठाऊक असते, तर दुसरीकडे कायद्यातील तरतुदींमुळे पोलिसांचाही नाईलाज होतो़
भाजीबाजार; मोबाइल चोरट्यांचे आगर !
By admin | Published: March 06, 2017 1:10 AM