नांदूरशिंगोटे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पणन महामंडळाचा मुंबईतील विधानभवनजवळील शेतकरी आठवडे बाजार बंद केल्यानंतर शेतकरी कंपन्यांकडून थेट घरपोहोच भाजीपाला विक्र ी सेवा दिली जात आहे. आठवडे बाजाराची आयोजक असलेल्या सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुकच्या शेतमाल अॅग्रो प्रोड्युसर कंपनीने विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे १० किलो पॅकिंग घरपोहोच देण्याची सेवा राबवली. ४० दिवसांत सुमारे ५० टन माल एक हजारावर कुटुंबांना पोहोच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अव्वाच्या सव्वा दर न आकारता बाजारभावही नियमितप्रमाणेच आकारणी केला आहे.पणन महामंडळाने राज्यभरात शेतकरी आठवडे बाजार सुरू केले आहेत. त्यासाठी नोंदणीकृत शेतकरी गट व कंपन्यांना प्रोत्साहन देण्यात आले. आता हे आठवडे बाजार बंद आहेत. अशा स्थितीत मंत्रालय परिसरातील सोसायट्यांच्या आवारात शेतकरी वाहन उभे करून पॅकिंग केलेला भाजीपाला विक्र ी केला जात आहे. कंपनीचे अध्यक्ष गणपत केदार, मधुकर कांगणे, संतोष उगले, सुखदेव आव्हाड यासाठी मेहनत घेत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांकडून भाजीपाला घेऊन स्वच्छ भाजीपाल्याची पॅकिंग केली जाते. त्याची चढ्या दराने विक्र ी न करता नियमित दर कंपनीकडून आकारला जातो.कंपनीच्या या उपक्रमाला रहिवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक अंतराचे बंधन राखून, स्वच्छतेचे नियम पाळून भाजीपाला विक्र ी केला जातो. कोबी, फ्लॉवर, मिरची, टोमॅटो, बटाटे, कांदा, लसूण आदी प्रकारचा भाजीपाला शेतात असूनही लॉकडाउनमुळे विक्र ीत अडथळे येत आहेत. व्यापारी कवडीमोल दरात त्याची खरेदी करून चढ्या दराने विक्र ी करत असल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत कंपनीने शेतकऱ्यांना चांगला दर तर दिलाच, शिवाय त्याची विक्र ी किरकोळ नफा मिळवून सुरू ठेवली आहे.
मंत्रालय परिसरातील रहिवाशांच्या दारात भाजीपाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 8:46 PM