जमिनीतील पाण्याची पातळी घटली असून, भाजीपाला उत्पादित होण्यात प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्पादनात घट आली आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याचा तुटवडा जाणवत असल्याने, दरात वाढ झाल्याची माहिती भाजी विक्रेते यांनी दिली. दरम्यान, सध्या नाशिकच्या बाजारसमितीत शहापूर येथून मिरची, कर्नाटक राज्यातून कोबी व गुजरात राज्यातून भेंडी घाऊक दरात विक्रीसाठी येते, तसेच पाण्याची उपलब्धता ज्या भागात आहे, अशा भागातून उर्वरित भाजीपाला विक्रीसाठी बाजारसमितीत येतो. तेथून किरकोळ भाजी विक्रेते हा भाजीपाला खरेदी करून, आपापल्या स्थानिक बाजाराबरोबर आठवडे बाजारात त्याची विक्री करतात. दरम्यान, उन्हाची तीव्रता, भूजल पातळीत आलेली घट, पिण्यासाठी पाणी, गुरांना पाणी या समस्यांचे निराकारण कसे करावे, हा प्रश्न उभा ठाकला असताना, भाजीपाला उत्पादनासाठी पाणी उपलब्ध करणे जिकिरीचे ठरले आहे. स्थानिक ठिकाणी स्वाभाविकपणे भाजीपाला उत्पादनावर याचा परिणाम झाल्याने महागडा भाजीपाला खरेदी करण्याची वेळ गृहिणी वर्गावर आली असून, काही भाज्या ऐंशी रुपये किलो तर काहींनी शंभरी गाठली आहे. कोथिंबीर, मेथीची भाजी व वेलवर्गीय भाज्याही महाग झाल्याने गृहिणी वर्गाचे अंदाजपत्रक कोसळले आहे.
भाज्यांनी गाठली किलोमागे शंभरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 4:11 AM