देवळा : गोवंशाची वाहतूक करणाºया गाडीला देवळा-मालेगाव रस्त्यावर खुंटेवाडीजवळील करला नाला येथे अपघात होऊन तीन जनावरांचा मृत्यू झाला, तर बॅटरीमुळे शॉर्टसर्किट होऊन गाडी पेटल्यामुळे गाडीचे नुकसान झाले. यावेळी चार जणांवर गुन्हा दाखल केला असून, दोन जण फरार झाले. अकरा जनावरे व गाडी असा दोन लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती देवळा पोलिसांनी दिली. रविवारी पहाटे एक ते दोन वाजेच्या दरम्यान देवळा-मालेगाव रस्त्यावरील खुंटेवाडी फाट्याजवळ हा अपघात झाला. टाटा कंपनीची गाडी ९०९, (क्र मांक एम एच ४८जे ३६२७) मधून अनिधकृतपणे अकरा जनावरांना पाय बांधून मालेगाव येथे कत्तलीसाठी नेण्यात येत होते. नागरिकांनी देवळा पोलीस ठाण्यात कळवले असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी जनावरांना उपचारासाठी दाखल करून पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार पंडित सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मालेगाव येथील इम्तियाज अहमद जावेद अहमद (वय २३, रा. चंदनपुरी), अली अहमद महंमद शाबीर, (वय २७, रा. नुमानीनगर), अशपाक अहमद अब्दुल करीम, (रा. नजमाबाद) व शेख आसिफ शेख नूर (रा. मदानेनगर) यांच्यावर अवैध गोवंशाची अमानुषपने वाहतूक करणे, त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन घटनास्थळावरून दोन संशियतांना अटक केली असून, इतर दोघे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. सदर घटनेचा पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ साबळे अधिक तपास करीत आहेत.
गाडी पेटल्यामुळे गाडीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 11:19 PM