नाशिक : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजात एजंटांचा वाढलेला सहभाग लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वीच परिवहन आयुक्तांनी आरटीओ कार्यालयात एजंटांना बंदी घालून तसे आदेश काढले आहेत. आरटीओ कार्यालयातदेखील या आदेशानुसार एजंटांना नो एण्ट्री करण्यात आली असली, तरी कार्यालयात वाहनांच्या कामांसाठी येणाऱ्या वाहनधारकांना कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून ठळक माहिती दिली जात नसल्याने वाहनधारकांची हेळसांड होत असल्याची तक्रार वाहनधारकांनी केली आहे. आरटीओ कार्यालयात वाहन परवाना नूतनीकरण, वाहनांची नोंदणी तसेच कर भरण्यासाठी व नवीन परवाना काढण्यासाठी नागरिक येत असतात. काही दिवसांपूर्वीच परिवहन आयुक्तांनी आरटीओ कार्यालयात एजंटांना प्रवेश नाकारल्याने आता वाहनधारकांना स्वत:च आरटीओ कार्यालयात वाहनांच्या कामांसाठी यावे लागत आहे. आरटीओ कार्यालयात वाहनधारक आल्यानंतर वाहनधारकांनी कार्यालयातील खिडकीत बसलेल्या कर्मचाऱ्यांकडे कोणत्या कामासाठी कोणाकडे जायचे, पैसे कोणाकडे भरायचे, पावती कोणाकडे मिळेल याची चौकशी केली असता काही कर्मचाऱ्यांकडून तिकडे विचारा असे सांगून ठळक माहिती दिली जात नसून एकप्रकारे हेळसांड केली जात आहे. विशेष म्हणजे या साऱ्या प्रकाराकडे आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय कोणत्या कामासाठी कोणता अर्ज पाहिजे त्या अर्जाबाबतही काही कर्मचाऱ्यांकडून माहिती दिली जात नसल्याने वाहनांच्या कामासाठी आलेल्या वाहनधारकांना प्रवेशद्वाराबाहेर जाऊन उभ्या असलेल्या एजंटांची काहीशी मदत घ्यावी लागत आहे. (प्रतिनिधी)
आरटीओ कार्यालयात वाहनधारकांची हेळसांड
By admin | Published: January 28, 2015 11:08 PM