सिडको : महापालिकेच्या वतीने सिडको, सातपूर व पश्चिम या तीन विभागांसाठी मृत जनावरे उचलण्यासाठी वाहनाची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. परंतु वाहनचालकाव्यतिरिक्त एकही कर्मचारी या वाहनावर देण्यात आलेला नसल्याने मृत जनावरे उचलण्यासाठी अडचणी येत असल्याचे समजते.नागरी वस्तीत तसेच मोकळ्या जागेत अनेकदा मृत जनावरे आणून टाकली जातात. सदर मृत जनावरांना उचलण्यासाठी महापालिकेकडे पूर्वी व्यवस्था नव्हती. यामुळे मृत जनावरे दोन ते तीन दिवस उचलले जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत होती. परंतु आता महापालिकेने सिडको, सातपूर व पश्चिम या तीन विभागासाठी मृत जनावरे उचण्यासाठी वाहनाची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. ही स्वागतार्ह बाब असली तरी या वाहनावर चालकाव्यतिरिक्त एकही कर्मचारी देण्यात आलेला नसल्याने मृत कुत्रे, मांजर तसेच इतर मृत जनावरे उचलण्यासाठी अडचणी येत आहे. या वाहनावरील चालकालाच सफाई कर्मचाऱ्यांची मनधरणी करून मृत जनावरे उचलावी लागत आहे. यातच दुपारी एक ते सहा या वेळात सफाई कर्मचाºयांची सुट्टी असते त्या वेळात मात्र वाहनचालकाला मोठी कसरत करावी लागत असल्याचे समजते. या वाहनचालकास सिडको, सातपूर व पश्चिम विभागातील मृत जनावरे उचलण्याची जबाबदारी असून, एवढ्या मोठ्या परिसरातून दररोज दहा ते पंधरा व त्यापेक्षाही अधिक मृत जनावरे उचलावी लागत आहेत.वाहनचालकाची दमछाकमनपाच्या वतीने मृत जनावरे उचलण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली असली तरी सिडको, सातपूर तसेच पश्चिम विभागासाठी वाहनचालकाला ही सर्व जबाबदारी पार पाडावी लागत आहे. चालकाने वाहन चालविण्याबरोबरच मृत जनावरे (कर्मचारी नसल्याने) देखील उचलण्याचे काम करावे लागत असल्याने वाहनचालकाची चांगलीच दमछाक होत असल्याचे समजते.
मृत जनावरे उचलण्यास वाहनव्यवस्था; मात्र कर्मचारी नसल्याने अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 12:11 AM