नाशिक : महाराज्य राज्य परिवहन महामंडळाकडून राज्यभरात आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या व्हीटीएसपीआयएस अर्थात व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम आणि पॅसेंजर इन्फरमेशन सिस्टीमचा पायलेट प्रोजेक्ट राबविण्याचा मान नाशिक जिल्ह्याला मिळाला आहे. सध्या जिल्हाभरात रस्त्यांची माहिती घेण्याचे काम चालू असून, त्याचे नियोजन पूर्ण होताच जिल्ह्यातील सहा आगारांमध्ये ही यंत्रणा सुरू होणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक नितीन मैंद यांनी दिली. या यंत्रणेमुळे प्रवाशांना बसचे लोकेशन, ती येण्यास लागणारा वेळ आदी गोष्टी बसस्टॅँडवर लावण्यात आलेल्या डिस्प्ले बोर्डद्वारे तसेच स्वत:च्या मोबाइलमधील याच सेवेच्या अॅपद्वारे लघुसंदेशाद्वारे समजणार आहे. बसची प्रतीक्षा किती काळ करावी लागेल? याचे चित्रही त्यामुळे स्पष्ट होणार आहे. हा प्रयोग नाशकात यशस्वी झाला तर त्याचा राज्यात सर्वत्र वापर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आंध्र प्रदेश परिवहन महामंडळात हा प्रयोग २०१४ पासून राबविण्यात येत असून, तेथे त्याला चांगले यशही मिळत आहे. यामुळे महामंडळाच्या सेवेचा दर्जा वाढण्यास मदत मिळणार आहे. ही यंत्रणा देशात काही परिवहन महामंडळात पूर्वीपासून राबविण्यात येत आहे. यात प्रवाशांची वेळेची बचत, यंत्रणेचा सुयोग्य वापर, प्रवाशांची वाढती संख्या असे अगणित फायदे होत आहे.रेल्वेच्या धर्तीवर असणाºया या यंत्रणेमुळे दीर्घ पल्ल्याच्या बसला काही कारणांमुळे उशीर होत असेल तर त्याची आगाऊ कल्पना मिळत असल्याने प्रवासी त्याचे नियोजन करू शकतात. याशिवाय लहान-मोठ्या अंतरावरील बसप्रवासातही याचा चांगला उपयोग होणार आहे. प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळू शकतो.ई-टॅगमुळे सोय, पण...राज्यात सर्वत्र बसेसना टोल देण्यासाठी टोलनाक्यावर रोख पैसे भरून पावती घेतली जात होती. आता बहुतांशी ठिकाणी ‘ई-टॅग’ सेवा सुरू करण्यात आली आहे. यात कॅशलेस पद्धतीने टोल भरला जात आहे. प्री-पेड मोबाइल सेवेप्रमाणे हे काम असून, रोख रक्कम हाताळण्याचा ताण यामुळे वाचला आहे. पूर्वी रोख रक्कम देत टोल भरल्यास शासनाकडून रकमेत सूट मिळत होती. ती सूट या सेवेतही मिळणार का? आणि बॅँकांच्या सेवाशुल्काचे काय? हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत. सध्या बँका यात कुठलेही शुल्क आकारत नसल्याचे समजते; पण भविष्यात त्या सेवाशुल्क आकारू शकतील त्यामुळे यात टोलचा खर्च वाढणार आहे.नाशिकहून दोन स्लीपर शिवशाहीया महिन्यापासून नाशिकहून नागपूर व कोल्हापूरसाठी दोन स्लीपर शिवशाही बस सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या त्या एकेकच असल्या तरी प्रवाशांचा प्रतिसाद पाहता त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नाशिक शहरातून पुणे-मुंबईसह राज्याच्या निरनिराळ्या भागात सध्या ६४ शिवशाही धावत असून, त्यातील काही बसेसना प्रवाशांचा प्रतिसाद उत्तम आहे तर काही बसेसना प्रतिसाद अत्यल्प आहे.
राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांसाठी व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:16 AM