नाशिकरोड : येथील सावरकर उड्डाणपुलाखाली काही भाजीविक्रेत्यांनी बुधवारी आपली दुकाने थाटली होती. दुपारी मनपा अतिक्रमणविरोधी पथक कारवाईकरिता आले असता भाजीविक्रेत्या महिला व युवकांनी अतिक्रमण पथकाच्या वाहनापुढे ठाण मांडून कारवाईला विरोध केला. यावेळी नाशिकरोड पोलिसांकडे मनपा प्रशासनाने बंदोबस्त मागितला.अतिक्रमणविरोधी कारवाईकरिता बंदोबस्त दिला जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून उड्डाणपुलाखाली बिटको पॉईंटचा भाजीबाजार बंद ठेवण्यात आला आहे. सोशल डिस्टन्स व इतर कारणास्तव तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून भाजीबाजार मनपा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने बंद ठेवला आहे. भाजीविक्रेत्यांना मनपा प्रशासनाकडून ठिीकठिकाणी व्यवसायासाठी जागा निश्चित करून दिल्या आहेत. उड्डाणपुलाखालील अनेक भाजीविक्रेते इतर ठिकाणी आपला व्यवसाय करत आहे. गेल्या काही दिवसांपासून उड्डाणपुलाखालील भाजीविक्रेत्यांनी भाजीबाजार पुन्हा पूर्ववत सुरू करावा याकरिता प्रयत्न चालवले असून, पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदनदेखील देण्यात आले आहे. मात्र अद्यापही मनपा प्रशासनाकडून उड्डाणपुलाखाली भाजीबाजार सुरू करण्यास हिरवा कंदील दिला गेला नाही. बुधवारी सकाळी उड्डाणपुलाखाली काही भाजीविक्रेत्यांनी आपली दुकाने थाटून व्यवसाय सुरू केला होता. यावेळी मनपा अतिक्रमणविरोधी पथक कारवाईसाठी आले. यावेळी नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी घटनास्थळी येऊन भाजीविक्रेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले. बिजली यांनी भाजीबाजार बंद ठेवणे अथवा सुरू करणे हा प्रश्न मनपाचा आहे. मनपाने जर अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मागितला तर आम्ही तो देऊन अतिक्रमण विरोधी कारवाई पूर्ण करू, असे स्पष्ट केले. यामुळे आता मनपाच्या पुढील निर्णय व धोरणाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.-------------------------नाशिकरोड पोलीस ठाण्यासमोर उड्डाणपुलाखाली अतिक्रमण विभागाचे वाहन कारवाईसाठी भाजीबाजारात जात असताना भाजीविक्रेते व महिलांनी या वाहनासमोर ठाण मांडून कारवाई करण्यास विरोध केला. दोन महिने झाले आमचा व्यवसाय बंद आहे. सर्वत्र भाजी व फळविक्री सुरू आहे, फक्त उड्डाणपुलाखाली विरोध केला जात आहे, आम्ही घर कसे चालवायचे, असा प्रश्न उपस्थित करत भाजीविक्रेत्यांनी कारवाईस विरोध केला.
भाजीविक्रेत्यांचे वाहनापुढे ठाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 10:13 PM