नाशिक- रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात जीव गमावले जातात. शासनाने वेगमर्यादा ठरवून दिली असली तरी त्याचे पालन मात्र होताना दिसत नाही. पुण्याच्या ‘परिसर’ या संस्थेने नाशिकमध्ये केलेल्या सर्वेक्षणात नाशिक शहरातील प्रमुख मार्गांवर ६० टक्क्यांपेक्षा वेगमर्यादेचे उल्लंघन होत आहे. वेगावर नियंत्रण नसल्याने अपघात वाढत असल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणात समोर आला आहे. राज्यात २०१९ मध्ये वाहनांच्या वेगामुळे अपघात होऊन ८ हजार १७५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसर संस्थेने नाशिक, तसेच पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या चार शहरांतील एकूण ३४ रस्त्यांचा अभ्यास करून वेगमर्यादेच्या उल्लंघनाचे निष्कर्ष काढले आहेत.
गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२० मध्ये प्रमुख रस्त्यांवर सर्वेक्षण केले आणि या रस्त्यांवरील ९ हजार ३८६ वाहनांची वेगमर्यादा तपासली. यात शरणापूर रोड, गंगापूर रोड, त्र्यंबकरोड, नाशिकरोड येथील तोफखानारोड (औटेनगर), जेलरोड यासह नाशिक-औरंगाबाद, मुंबई-आग्रा महामार्ग,
नाशिक-पुणे रोडचा समावेश होता. या मार्गांवर ५० टक्के दुचाकी, २९ टक्के चारचाकी, १० टक्के तीनचाकी आणि आठ टक्के अवजड वाहने सर्वेक्षणाच्या वेळी होती.
गंगापूररोडवर सकाळी वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनांचे प्रमाण ६४ टक्के, तर रात्री ते ४८ टक्के असल्याचे आढळले. शरणपूर रस्त्यावर बहुतांश वाहनांचा वेग ताशी ३१ ते ३५
किलोमीटरदरम्यान आढळला, तर जेलरोडवर अधिकाधिक वाहने सरासरी ताशी ३३ किलोमीटर अधिक वेगाने धावत होती. नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर बहुतांश वाहनांचा वेग ४६ ते ५० किलोमीटरदरम्यान होता. नाशिक-पुणे रस्त्यावर १ हजार ३५८ वाहनांचे वेग तपासले. यात ताशी ४१ ते ४५ किलोमीटर वेगाने वाहने धावत होती.
मुंबई-आग्रा रस्त्यावर ताशी ४६ ते ५० किलोमीटर, तोफखाना रस्त्यावर २६-३० किलोमीटर, गंगापूर रस्ता ३१ ते ३५ किलोमीटर, त्र्यंबकरोडवर १-४५ किलोमीटर या वेगाने वाहने धावत हेाती.
कोट...
वेगमर्यादेचे उल्लंघन सर्वत्र सर्रास हाेत आहे. मात्र, संंबंधित वाहन चालकांवर कारवाई हाेत नाही. मुळात शासनाने ठरवून दिलेली वेगमर्यादा ही कमाल आहे. म्हणजे जास्तीत जास्त वाहने त्या वेगाने चालविता येतात. स्थानिक पातळीवर रस्त्यांची स्थिती आणि वाहनांची संख्या बघून कमी-अधिकाधिक वेगमर्यादा ठरविता येते; परंतु तसे केले जात नाही.
-संदीप गायकवाड, सिनिअर प्रोग्रॅम असोसिएट, परिसर संस्था, पुणे
इन्फो...
रस्ता वेगमर्यादेचे उल्लंघन
शरणापूररोड ७२ टक्के
गंगापूर रोड ६२ टक्के
शरणापूर रोड ७२ टक्के
त्र्यंबकरोड ७१ टक्के
तोफखाना रोड (औटेनगर) ९५ टक्के
जेलरोड ६४ टक्के
मुंबई-आग्रा महामार्ग ८८ टक्के
नाशिक-पुणे रोड ७५ टक्के
नाशिक-औरंगाबाद रोड ९४ टक्के
इन्फो..
शहरांसाठी वेगमर्यादा
राज्य शासनाने वेगमर्यादा ठरवून दिली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये जारी करण्यात आलेल्या वेगासंदर्भातील अधिसूचनेनुसार महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर चारचाकी मोटारीसाठी ताशी ६० किलोमीटर,
दुचाकींसाठी ताशी ५० किलोमीटर आणि तीनचाकी वाहनांसाठी (ऑटो रिक्षासारखी वाहने) ४० किलोमीटरची मर्यादा स्पष्ट केली आहे. मात्र, वेगमर्यादेचे पालन होत नाही, असे आढळले आहे.