इंदिरानगर : काही हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर वीस लाख रुपयांचा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेले संशयित संचालक दिनेश बाविस्कर व सुधाकर घोटेकर यांची २२ लाख रुपयांची दोन वाहने इंदिरानगर पोलिसांनी जप्त केली आहेत़ तर उर्वरित संचालक ज्ञानेश्वर पाटील, सागर नांद्रे व रवि त्रिपाठी यांचा शोध सुरू आहे़ ई-शॉपीच्या संचालकांविरोधात २० आॅगस्ट रोजी २०१८ रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शोधक पथकाने बाविस्कर व घोटेकर यांना अटक केली होती़ त्यांची कसून चौकशी केल्यानंतर आठ लाख रुपये किमतीची मारुती स्विफ्ट (एमएच १५, जीएफ ०८०८) व चौदा लाख रुपये किमतीची महिंद्रा एक्स यू व्ही (एमएच १५, जीएफ ३१३१) असा २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे, पोलीस निरीक्षक आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नागेश मोहिते व गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी अधिक तपास करीत आहेत़
ई-शॉपीच्या संचालकांची २२ लाखांची वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:22 AM