बुधवारी आठवडेबाजार असल्याने मनपाचे अतिक्रमण पथक सकाळी गंगाघाटावर दाखल झाले, त्यावेळी शुकशुकाट होता तर दुपारी विक्रेत्यांनी दुकाने थाटून आठवडेबाजार बसविला. कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आठवडेबाजाराला बंदी घातली असताना बाजार बसल्याचे निदर्शनास येताच मनपा पंचवटी विभागीय अधिकारी विवेक धांडे व पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अधीक्षक भूषण देशमुख, राजेंद्र सोनवणे, दीपक मिंधे, संजय बोरसे आदींनी कारवाई केली. यावेळी विक्रेत्यांचे रिकामे पोते, कॅरेट, भाजीपाला जप्त करत वाहनात ध्वनिक्षेपकाहून नागरिकांना सूचना दिल्या. औरंगाबाद रोडवरील निलगिरी बागेत दर बुधवारी व रविवारी आठवडेबाजार भरतो. कोरोना पार्श्वभूमीवर बाजार भरवू नये, याबाबत सूचना दिल्यानंतर सकाळी काही विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. मनपा अतिक्रमण पथकाने निलगिरी बागेत जात भाजीबाजार उठविला. बाजार बसविण्यास परवानगी नसल्याने भाजी विक्रेत्यांनी पंचवटी विभागीय कार्यालयात जाऊन प्रभाग सभापती शीतल माळोदे यांची भेट घेत यावर तोडगा काढावा, अशी मागणी केली असता माळोदे यांनी प्रशासनाशी ठोस चर्चा करत मार्ग काढणार असल्याचे सांगितले.
इन्फो====
पथकावर राजकीय दबाव
कोरोना नियम पायदळी तुडवत जात असल्याने पंचवटी मनपा पथकाकडून कारवाई केली जात आहे. मात्र, नियम पायदळी तुडविणारे काही व्यावसायिक थेट लोकप्रतिनिधींना फोन करून कारवाईसाठी आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना फोन देत राजकीय दबाव आणत असल्याने कारवाईसाठी गेलेल्या मनपाच्या पथकाला खाली हात परतावे लागते.
(फोटो १७ बाजार)