नाशिक : आर्ट आॅफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने होणाऱ्या ‘वेणुनाद’ या विश्वविक्रमी कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून, उद्या (दि. १२) सायंकाळी ६.३० वाजता तपोवनातील साधुग्राम मैदानावर हा भव्यदिव्य सोहळा साकार होणार आहे. आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर, प्रख्यात बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या उपस्थितीत पाच हजारांहून अधिक वेणूंचे स्वर आसमंतात गुंजणार आहेत. गेल्या महिनाभरापासून या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. देशभरातील वादक, स्वयंसेवक नाशकात दाखल झाले आहेत. कार्यक्रमासाठी तपोवनातील १९ एकर मैदानावर तीस हजार चौरस फूट आकाराचा मंच उभारला जात आहे. त्यावरील चार टप्प्यांवर पाच हजार बासरीवादक विराजमान होणार आहेत. या मंचावर १२ बाय २०० फुटांची एलईडी स्क्रीन लावली जाणार आहे, तर मैदानावर १२ बाय ४० फुटांच्या स्क्रीन्स बसविल्या जाणार आहेत. कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांसाठी चार ते पाच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी ६.३० ते रात्री ९ अशी कार्यक्रमाची वेळ असून, ७.१० ते ७.३० यावेळेत श्री श्री रविशंकर हे उपस्थिताना संबोधित करणार आहेत, तर ७.३० ते ७.३७ या वेळेत मुख्य बासरीवादनाचा कार्यक्रम होणार आहे.
नाशकात आज गुंजणार ‘वेणुनाद’
By admin | Published: January 12, 2015 12:46 AM