नाशिक: तंत्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी जात वैधता प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आल्याने प्रमाणपत्रासाठी पडताळणी कार्यालयात गेल्या दहा दिवसापासून असलेली गर्दी गुरुवारी काहीशी ओसरली. बुधवारी रात्री ११ वाजेपर्यंत जवळपास ८०० दाखले वितरित करून विद्यार्थ्यांना सुपूर्द करण्यात आले. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून सकाळी ९ ते रात्री उशिरापर्यंत कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला.
नासर्डी पुलाजवळ असलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात गेल्या दहा दिवसापासून दाखल्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. यापूर्वी दाखल केलेेली प्रकरणे तसेच ऐनवेळी प्रवेशासाठी लागणारा पडताळणी दाखला मिळविण्यासाठी कार्यालयात एकच गर्दी झाली होती. प्रवेशासाठी कमी वेळ असल्याने आणि पडताळणी प्रमाणपत्र सक्तीचे केल्यामुळे लागलीच दाखला मिळावा असा आग्रह विद्यार्थी धरत असल्याने काहीसा गोंधळ झाला. कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी लागणारा वेळ आणि ऑनलाईन प्रक्रियेत अधिक वेळ खर्च हेोत असल्याने अखेर ऑफलाईन प्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांना शक्य तितक्या लवकर प्रमाणपत्र वितरित करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी कमी मनुष्यबळात अधिक वेळ काम करून कर्मचाऱ्यांनी प्रक्रिया राबविली.
पहिल्या १० ते १७ तारखेपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत काम करून प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. दि. १९ आणि २० या दोन दिवसात सर्वाधिक वेगाने आणि अधिक वेळ कामकाज करण्यात आल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पडताळणीचा दाखला मिळू शकला. दि.१९ रोजी सकाळी ८ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत म्हणजे संपुर्ण रात्र कामकाज करण्यात आले. दि. २० रोजी सकाळी ९.४५ ते रात्री ११ वाजेपर्यंत कागदपत्रांची पडताळणी आणि दाखला वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होती. या दोन्ही दिवशी विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि संघटनांची निवेदने यांना तोंड देत अधिकधिक दाखले तयार करून विद्यार्थ्यांच्या सुपूर्द करण्यात आले.