उमराणे : येथील ब्रिटिशकालीन परसूल धरणातील पाणीसाठा अत्यंत अल्प प्रमाणात शिल्लक राहिल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. या धरणात चणकापुर कालव्याचे पाणी सोडण्यात यावे,अशी मागणी उमराणेसह परिसरातील आठ ते दहा गावातील सरपंच व ग्रामस्थांनी केली असून तसा ठरावही लोकप्रतिनिधींसह शासनाकडे पाठविण्यात आला आहे.उमराणे येथे १८८५ साली ब्रिटिशकालीन परसुल धरण बांधण्यात आले आहे. या धरणातील पाण्यावर उमराणे येथील शेतीसाठीच्या आवर्तनासह परिसरातील तिसगाव, दहिवड, रामवाडी आदी गावांसाठी पेयजल योजना कार्यान्वित आहेत. परंतु चालूवर्षी तालुक्याच्या पूर्व भागात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने हे धरण रिकामेच राहिले आहे. सद्यस्थितीत उपलब्ध असलेला पाणीसाठा बघता साधारणत: एक महिना पुरेल एवढेच पाणी शिल्लक असल्याने आगामी काळात उमराणेसह परिसरातील आठ ते दहा गावांना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर होणार आहे. यावर उपाययोजना म्हणून चणकापूर धरणातील पाणी उजव्या कालव्याद्वारे उमराणे येथील परसुल धरणात सोडण्यात यावे, अशी मागणी प.स.सदस्य धर्मा देवरे, उमराणेच्या सरपंच लताबाई देवरे, गिरणारेचे उपसरपंच ईश्वर पाटील, खारीपाडाचे सरपंच कैलास अहिरे, तिसगावचे सरपंच दत्तू अहेर, कुंभार्डेच्या सरपंच प्रतिभा वाघ,चिंचवेचे सरपंच रविंद्र पवार, सांगवीचे सरपंच पंडित बस्ते, वर्हाळेच्या सरपंच सरला खैरणार आदिंसह नागरिकांनी केली आहे.
परसूल धरणात अत्यल्प पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 4:07 PM
चिंतेत भर : चणकापूरमधून पाणी टाकण्याची मागणी
ठळक मुद्देचालूवर्षी तालुक्याच्या पूर्व भागात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने हे धरण रिकामेच राहिले आहे