येवला : चार वर्षांपूर्वी अपर जिल्हाधिकाऱ्यांना जीवंत जाळून मारल्याचा वहीम असलेल्या कुणाल पोपट शिंदे या सराईत गुन्हेगाराला नाशिकसह पाच जिल्ह्णातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. येवला उपविभागीय अधिकाऱ्यांनी या संदर्भातील आदेश पारित केले असून, त्याच्या अंमलबजावणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कुणाल शिंदे याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हत्याराने हल्ला, भेसळ करणे, दंगल माजविणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, राज्यात गाजलेल्या अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या हत्येत तो प्रमुख संशयित आरोपी आहे. १५ जानेवारी २०११ मध्ये मनमाड-नांदगाव रस्त्यावरील जोंधळवाडी शिवारात हा प्रकार घडला होता. पेट्रोल, डिझेलच्या टॅँकरमधून इंधनाची चोरी करून त्यात घासलेटची भेसळ करून त्याची विक्री केली जात असल्याने त्याला अटकाव करण्यासाठी सोनवणे गेले असता, कुणाल शिंदे व त्याचे वडील पोपट शिंदे यांनी अंगावर पेट्रोल ओतून सोनवणे यांची हत्त्या केल्याचा गुन्हा पोलिसात दाखल आहे. २०१२ मध्येही लग्नाच्या कार्यक्रमात डी.जे. वाजविण्यावरून त्याने एकावर तिक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केले होते.(वार्ताहर)
बहुचर्चित कुणाल शिंदे हद्दपार
By admin | Published: December 23, 2014 12:20 AM