नाशिक - ज्येष्ठ रंगकर्मी, शिल्पकार नेताजी भोईर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी आज सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सूना व नातवंडे असा परिवार आहे. स्वत: संहिता लिहायची, स्वत:च दिग्दर्शन करायचे, स्वत:च नेपथ्यकाराची भूमिका निभवायची आणि प्रसंगी अभिनयही वठवायचा. अशी चौफेर कामगिरी बजावणारा हा अवलिया कलाकार वयाच्या नव्वदीतही रंगभूमीशी आपले नाते टिकवून होता. विजय नाट्य मंडळाच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीशी आपले नाते अधिक घट्ट केले. महाराष्ट शासनाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत सलग ५० वर्षे नाटक सादरीकरणाचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे ते अध्यक्ष होते शिवाय, विविध संस्थांशी त्यांचा निकटचा स्नेह होता. रंगभूमीवरील कारकीर्दीबाबत त्यांना अनेक मान-सन्मान प्राप्त झाले. वयाच्या ८० व्या वर्षी नाशिककरांच्यावतीने त्यांचा जाहीर नागरी सत्कारही करण्यात आला होता. नाटक हाच आपला श्वास मानतानाच नेताजी भोईर यांनी मूर्तीकलेतही स्वत:ची प्रतिमा निर्माण केली होती. गणेशोत्सवात दाखविण्यात येणाºया आराशीसाठी ते वेगवेगळ्या विषयावर मूर्तीकाम करायचे. त्यांच्या देखाव्यांना राज्यभरातून मागणी असायची. त्यांचा स्वत:चा विजय ब्रास बॅण्डही होता. मागील वर्षी झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी सादर केलेले ‘हे रंग जीवनाचे’ हे त्यांचे अखेरचे नाटक ठरले. वयोमानामुळे गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यामुळे सार्वजनिक सहभाग कमी झाला होता. आज सकाळी अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. रंगभूमी आणि मूर्तीकलेतील एक दादा माणूस गेल्याने नाशिककरांवर शोककळा पसरली आहे.
ज्येष्ठ रंगकर्मी, शिल्पकार नेताजी भोईर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 11:01 AM
रंगभूमीवर शोककळा : दुपारी पंचवटी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार
ठळक मुद्देरंगभूमी आणि मूर्तीकलेतील एक दादा माणूस गेल्याने नाशिककरांवर शोककळा महाराष्ट शासनाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत सलग ५० वर्षे नाटक सादरीकरणाचा विक्रम त्यांच्या नावावर