- संजय दुनबळे ( नाशिक )
एखाद्या कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्च पदस्थाच्या वार्षिक वेतनापेक्षा अधिक उत्पन्न केवळ ५७ आर क्षेत्रातून मिळविता येऊ शकते, हे सिद्ध केले आहे नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील खर्डे येथील मन्साराम वामन देवरे या वयोवृद्ध शेतकऱ्याने. एकाच वेळी तीन पिके घेऊन १५ महिन्यांमध्ये देवरे यांनी तब्बल १७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. तीनही पिकांना मिळून त्यांना एकूण एक लाख ५० हजारांचा खर्च आला.
देवळा तालुक्यातील खर्डे येथे मन्साराम देवरे यांची केवळ ५७ आर इतकी शेतजमीन आहे. दरवर्षी शेतात नवनवीन प्रयोग करणारे शेतकरी म्हणून ते परिसरात परिचित आहेत. यावर्षी मन्साराम देवरे यांनी आपल्या क्षेत्रात लाल कांदा, उन्हाळ कांदा आणि पपईचे उत्पन्न घेऊन चांगले उत्पन्न मिळविले आहे. सुरुवातीला त्यांनी शेतात तब्बल पाच ट्रक शेणखत टाकले. त्यानंतर जमिनीची मशागत करून प्रथम लाल कांद्याची लागवड केली. कांदा लागवडीनंतर त्यांनी त्याच क्षेत्रात पपई लागवडीचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे कामास सुरुवात केली.
निफाड तालुक्यातील उगाव येथील नर्सरीतून त्यांनी तैवान ७८६ वाणाची पपईची रोपे आणली. पपईचे एक रोप त्यांना १० रुपयांना घरपोहोच मिळाले. वाफ्यांच्या वरंबीवर सात बाय सातच्या अंतरावर त्यांनी १३०० रोपांची लागवड केली. पपईची झाडे असल्यामुळे त्यांना कांदा पिकात तणनाशक मारता येत नव्हते त्यामुळे तीन वेळा कांद्याची निंदणी करावी लागली. यासाठी त्यांना ४० हजार रुपयांचा खर्च आला. तीन ते साडेतीन महिन्यांत लाल कांद्याचे पीक निघून गेले. लाल कांद्याचे २५० क्विंटल उत्पादन त्यांना मिळाले. या कांद्याला त्यावेळी १४०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. लाल कांदा काढल्यानंतर त्यांनी पुन्हा त्याच जमिनीत उन्हाळ कांद्याची लागवड केली. तोपर्यंत पपईची झाडे मोठी होत होती. उन्हाळ कांद्याचेही त्यांना २५० क्विंटल उत्पादन मिळाले. त्यालाही चांगला भाव मिळाला. दोन्ही कांदे निघेपर्यंत ७-८ महिन्यांचा काळ निघून गेला. या काळात पपईच्या झाडांची चांगली वाढ झाली.
उन्हाळ कांदा निघाल्यानंतर पपईला फळधारणा झाली. लागवडीनंतर नवव्या महिन्यापासून त्यांना पपईचे उत्पादन सुरू झाले. ते पुढे सहा महिने चालले. पपईचे त्यांना ४० ते ४५ टन उत्पादन झाले. ते त्यांनी व्यापाऱ्याला १२ ते १३ रुपये किलोने जागेवर विकले. पपईचा हंगाम संपत आल्यानंतर त्यांनी पपईच्या झाडांचा चीक काढण्याचा सौदा व्यापाऱ्याला दिला. चिकापोटी त्यांना १ लाख २५ हजार रुपये मिळाले. तीनही पिकांतून देवरे यांना १५ महिन्यांत खर्च वजा जाता १७ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. आता पपईचा हंगाम संपला असून, झाडांचा चीक काढल्याने ती वाळू लागली आहेत. आता झाडांवर रोटरी मारून त्याचेच ते पुढील पिकासाठी खत करणार आहेत. पाण्यासाठी त्यांच्याकडे बोअर आहे. पाणी कमी पडल्यास त्यांच्याकडे १० हजार लिटरचा टॅँकर असून, गावातून पाणी आणून ते पीक जगवितात, असे देवरे यांनी सांगितले.