नाशिक : मुक्त विद्यापीठाच्या नूतन कुलगुरूपदाची निवडप्रक्रिया येत्या दोन महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेची संयुक्त बैठक होऊन कुलगुरू निवड समितीसाठी विद्यापीठाकडून एका सदस्याच्या नावाची शिफारस केली जाणार असल्याचे समजते. अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत डॉ. माणिकराव साळुंखे यांनी कुलगुरूपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त असून, प्रभारी कुलगुरू म्हणून आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर कामकाज पाहत आहेत. मुक्त विद्यापीठातील नाट्यमय घडामोडींनंतर माणिकराव साळुंखे यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने त्यांच्या राजीनाम्याने चर्चेला उधाण आले होते. शिक्षणमंत्री तावडे आणि साळुंखे यांच्यात मतभेद झाल्याची चर्चा सर्वत्र पसरली तर नियमबाह्य कामकाजाच्या मुद्द्यावरून कुलगुरू नाराज असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचेही चर्चेत होते. प्रत्यक्षात कुलगुरूंकडून याबाबतची स्पष्टता झाली नसली तरी कामकाज करताना स्वातंत्र्य नसल्याचा मुद्दा त्यांनी वारंवार अधोरेखित केला. निवडीनंतर अवघ्या दोनच वर्षांत माणिकराव साळुंखे यांनी राजीनामा दिल्यानंतर नूतन कुलगुरू निवडप्रक्रिया कधी सुरू होणार, अशी चर्चा असतानाच राजभवनाकडून निवडप्रक्रियेची तयारी चालविली जात असल्याचे समजते. कुलगुरू निवड प्रक्रियेसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली जाते. यामध्ये एक उच्च तंत्रशिक्षण समितीचे सचिव, एक राज्यपाल नियुक्त सदस्य आणि संबंधित विद्यापीठाकडून नियुक्त सदस्य अशा तिघांची समिती नियुक्त केली जाते. यासाठी विद्यापीठाला एका सदस्याच्या निवडीसाठी व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेची संयुक्त बैठक घेण्याबाबत सूचना करण्यात आली असून, लवकरच या दोन्ही प्राधिकरणाची बैठक बोलविण्यात येणार असल्याचे समजते. (प्रतिनिधी)
कुलगुरू निवडप्रक्रिया दोन महिन्यांत शक्य
By admin | Published: September 02, 2016 12:56 AM