शनिवार (दि. २४) रोजी सकाळी साळवे मळ्यातील पडिक विहिरीत अज्ञात व्यक्तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना शेतकऱ्यास आढळून आला होता. मृतदेह पूर्णत: कुजलेला असल्यामुळे त्याची ओळख पटू शकली नव्हती. मात्र, दोरीच्या सहाय्याने त्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले होते. खून झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांपुढे आव्हान होते. अखेरीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर व गुन्हे शोधक पथक यांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यामध्ये खून झालेल्या व्यक्तीच्या हातावर शंकराची पिंड व हनुमानाचे गोंदलेले चित्र असल्याने त्या आधारे शोध घेतला असता, त्याचे नाव दिनेश गेहरू पाल (३०) असल्याचे निष्पन्न झाले. तो उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्या वडील व भावांना बोलावून ओळख पटविली आहे. नाशिक शहरातील विविध जनावरांच्या गोठ्यात कामगार म्हणून तो काम करीत होता. त्याची ओळख पटल्याने आता त्याच्या खुनाच्या तपासाला गती दिली जाणार आहे.
खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 4:16 AM