मेशी : निम्मा जून संपला असून, अद्याप मान्सूनचे किंवा मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले नसल्याने बळीराजासह सगळ्यांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. भीषण दुष्काळी परिस्थितीला तोंड देत असलेल्या देवळा पूर्वभागातील जनतेला गेल्या अनेक दिवसांपासून हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पर्जन्यमान चांगले आहे. याचा प्रत्यय अजूनपर्यंत आलेला नाही. दररोज हवामान खात्याकडून पावसाचे अंदाज वर्तविले जात आहेत; मात्र सगळेच खोटे ठरत असल्याने सगळ्यांचाच विशेषत: बळीराजाचा जीव टांगणीला लागला आहे.अनेक ठिकाणी खरीप हंगामासाठी जमिनीची मशागत अनेक शेतकऱ्यांनी पूर्ण केली असून, ते आज पाऊस येईल, उद्या पाऊस येईल या आशेने प्रतीक्षा करीत आहे. मात्र जो दिवस येतो सारखाच. दररोज सकाळ, दुपार, सायंकाळ असे तिन्ही प्रहरी वातावरण वेगवेगळे असते. कधी जोराचा वारा, कधी उकाडा, कधी ढगाळ हवामान असे वेगवेगळे चित्र निसर्गात पाहावयास मिळत आहेत.जसजसा पाऊस लांबणीवर पडत आहे तसतसे शेतकऱ्यांचे काळजाचे ठोके वाढत आहेत. मुक्या जनावरांचा चारा कधीच संपला असून, चारा विकत घेणेही आवाक्याबाहेरचे असल्याने जनावरांचा हालअपेष्टा पाहण्यापलीकडे पर्याय नाही. दोन ते चार हजार रुपयांपर्यंत चाऱ्याचे दर परवडत नसल्याने काहींनी जनावरे विकण्यास काढली आहेत. पावसाळा लांबत असल्याने पिकांचे खरीप पिकांचे वेळापत्रक कोलमडणार हे नक्की. मृग नक्षत्राच्या सुरुवातीस मूग, उडीद, तूर अशा कडधान्यांच्या पेरण्या करून त्यानंतर इतर पिकांसाठी जमीन मोकळी केली जाते; मात्र पाऊस लांबत असल्याने कडधान्य उत्पादनावर त्याचा परिणाम होणार हे निश्चित. नक्षत्र बदलले की शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होतात; एकूण ११ नक्षत्रांना पिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्व आहे. अजून किती दिवस वरुणराजा वाट पाहाण्यास लावणार कुणास ठाऊक. सगळीके वरूणराजा बरसण्यासाठी आराधना सुरू झाल्या आहेत. सगळ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. (वार्ताहर)
अंदाज चुकल्याने बळीराजा चिंतित
By admin | Published: June 18, 2016 11:04 PM