त्र्यंबकेश्वर : अयोध्या येथील रामजन्मभूमीचे प्रमुख आचार्य पंडित गंगाधर पाठक यांनी अंजनेरी हेच हनुमान जन्मस्थळ असल्याचा निर्वाळा दिल्याने अंजनेरी येथे आयोजित बैठकीत साधू-महंतांसह ग्रामस्थांनी विजयोत्सव साजरा केला. तसेच सर्व पुराव्यानिशी न्यायालयात जाण्याचाही बैठकीत निर्णय घेण्यात आला. नाशिकचे वेदशास्त्र संपन्न पंडित शांतारामशास्त्री भानोसे यांनी विविध पुराणांचा आधार घेऊन केलेल्या दाव्याची पुष्टी गंगाधर पाठक यांनी केल्याने अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचे सिद्ध झाल्याने साधू-महंतांनी यावेळी सांगितले.
किष्किंधाचे मठाधिपती स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी किष्किंधा हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा केल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यावर तीव्र पडसाद उमटून स्वामींच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल होऊन ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलनही केले होते. तर नाशिक येथेही धर्मसभा होऊन त्यात प्रकरण हातघाईवर गेले होते. या साऱ्या घटनाक्रमांनंतर अयोध्येतील रामजन्मभूमीचे प्रमुख आचार्य पंडित गंगाधर पाठक यांनी अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा निर्वाळा दिला. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.२) अंजनेरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश चव्हाण यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरातील साधु-महंत, ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस अनेक महंतांनी हा विजयोत्सव असल्याचे सांगत हनुमानाचे जन्मस्थळ बदलू शकत नसल्याची ग्वाही दिली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य कमळु कडाळी यांनीही अंजनेरी डोंगरावरच सारे पुरावे उपलब्ध असल्याचे सांगितले. महंत सुधीरदास पुजारी यांनी अंजनेरी मुद्यावर सर्वांची एकजूट होणे गरजेचे असल्याचे सांगत स्वामी गोविंदानंद यांच्यावर टीकास्त्र सोडले. स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी आपणास संविधानिक, धार्मिक मार्गाने जिंकायचे असेल तर न्यायालयात जाणे इष्ट आहे. आपल्याकडे सर्वप्रकारचे पुरावे आहेत. त्यात आपण नक्कीच जिंकू असा विश्वास व्यक्त केला.
बैठकीला महंत भक्तीचरणदास, नाथानंद सरस्वती महाराज, सुदर्शनानंद सरस्वती, रामानंद सरस्वती, महंत अशोकगिरी महाराज, महंत उदयगिरी महाराज, ठाणापती दुर्गानंद ब्रह्मचारी, महंत पिनाकेश्वरगिरी ठाणापती, अभयानंद ब्रम्हचारी, दिगंबर अजयपुरी, महंत खडेश्वरीजी महाराज, महंत भीमाशंकर गिरीजी, आदींसह जि.प.चे माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे, जेष्ठ नेते सुरेश गंगापुत्र, गणेश चव्हाण, राजाराम चव्हाण, राजेंद्र बदादे, गवळी, माजी सरपंच मधुकर लांडे उपस्थित होते.
इन्फो
ती धर्मसभा नव्हतीच- शंकरानंद सरस्वती
अखिल भारतीय अखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष तथा श्रीपंच दशनाम आनंद आखाड्याचे सचिव श्रीमहंत शंकरानंद सरस्वती तथा भगवान बाबा उपस्थित होते. त्यांनी सांगितले, नाशिकरोडला झाली ती धर्मसभाच नव्हती. धर्मसभा बोलावण्याचा अधिकार केवळ संन्यासी साधू-महंत यांनाच असतो. त्या सभेला चार पीठाचे चार शंकराचार्य असतात. त्यात द्वारका पीठम रामानंदाचार्य, वल्लभाचार्य, निम्बारकाचार्य शिवाय तेराही आखाड्याचे आचार्य, काशी विद्वत्त परिषद व भारतातील रामायणाचे गाढे अभ्यासक सभेला उपस्थित असणे अनिवार्य असते. तीच विद्वत्त धर्म परिषद असते. गोविंदानंद सरस्वती यांना ही सभा बोलावण्याचे कोणी अधिकार दिले होते. म्हणूनच त्या अनधिकृत सभेला बरेच संत महंत विद्वान उपस्थित राहिले नव्हते. असे स्पष्ट केले.