लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या झालेल्या मनपा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या विजयी उमेदवार व पदाधिकाऱ्यांचे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत करीत विजय मिरवणुका काढल्या. यामुळे मतमोजणी केंद्र परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. पश्चिम भागात ढोल-ताशे व गुलालाची उधळण करीत उमेदवारांचे स्वागत करण्यात आले, तर पश्चिम भागात चौकाचौकातून विजयी फेऱ्या काढण्यात आल्या होत्या. शहराच्या पश्चिम भागात शिवसेना व भाजपात तर पूर्व भागात राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर झाली. सर्वच निकाल धक्कादायकरीत्या लागले. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या जल्लोषात मिरवणुका काढल्या जात होत्या. येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील मतदान केंद्राबाहेर शिवसेना - भाजपाच्या उमेदवारांच्या समर्थकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. २०० मीटरपर्यंत जाळ्या लावून समर्थकांना पोलिसांनी अडविले होते. सकाळी ११ वाजेनंतर निकाल हाती येत होते. प्रभाग क्रमांक एकचा निकाल जाहीर झाल्यानंतर समर्थकांनी कॅम्प भागात विजयी मिरवणूक काढली होती, तर पूर्व भागात राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी झेंडे फडकवित विजयोत्सव साजरा केला. एकमेकांना विजयी झाल्याच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या. निकालामुळे कॅम्प भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पूर्व भागात निघालेल्या विजयी मिरवणुकांमध्ये काँग्रेसचे आमदार आसिफ शेख, माजी आमदार रशीद शेख, एमआयएमचे नेते उपमहापौर युनुस इसा, माजी महापौर अब्दुल मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल तर पश्चिम भागातील विजयी मिरवणुकांमध्ये शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, भाजपाचे सुनील गायकवाड, आमदार डॉ. अपूर्व हिरे आदि सहभागी झाले होते.
नेत्यांचा विजय, कार्यकर्त्यांचा जल्लोष
By admin | Published: May 27, 2017 1:01 AM