नाशिक : तपोवनात साधुग्रामची उभारणी करण्यासाठी लागणारी जागेची निकड पूर्ण होण्याची चिन्हे दिसू लागली असून, १६३ पैकी ८५ शेतकऱ्यांनी लिखित स्वरूपात, तर अन्य शेतकऱ्यांनी तोंडी होकार कळविल्याने येत्या दोन दिवसांत प्रत्यक्षात जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडून जागेचा ताबा घेताना व तो तत्काळ महापालिकेकडे सुपूर्द करताना छायाचित्रे व ध्वनिचित्रफीत काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू-महंतांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी तपोवनात साधुग्राम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी तेथील शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेतत्त्वावर अकरा महिन्यांसाठी अधिग्रहित करण्याबाबत नाशिक तहसीलदारांनी शेतमालकांना नोटिसा बजावल्यानंतर १६३ शेतकऱ्यांपैकी ८५ शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष हजर होऊन जागा देण्याची संमती दिली आहे, तर उर्वरित जागामालकांनी काही तांत्रिक कारणास्तव वेळ मागून घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या जागा ताब्यात घेण्याविषयी प्रशाासनाला कोणतीही अडचण दिसत नाही; परंतु तपोवनातच काही बांधकाम व्यावसायिकांच्या पिवळ्या पट्ट्यातील जागा असून, त्यांची संख्याही जवळपास ५० च्या आसपास आहे. पिवळ्या पट्ट्यातील जागा असल्यामुळे त्यांनी बाजारमूल्याप्रमाणे (रेडीरेकनर) मोबदला मिळावा अशी मागणी केलेली असल्याने तूर्त प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून जे शेतकरी जागा देण्यास तयार आहेत, त्यांच्या जागेचा तत्काळ ताबा घेण्यास सुरुवात केली आहे. जागेचा ताबा घेतानाच त्यांना ६० टक्के मोबदल्याची रक्कम दिली जाणार असून, उर्वरित ४० टक्के एप्रिलमध्ये दिले जातील. शेतकऱ्याकडून जागेचा ताबा घेताना त्याची ध्वनिचित्रफीत व छायाचित्र काढून घेण्यात येणार आहे, जेणेकरून तो महत्त्वाचा पुरावा ठरेल. त्याचबरोबर साधुग्रामसाठी जागा ताब्यात घेण्यासाठी अगोदरच उशीर झाल्याचे पाहून जशा शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यात येतील, त्या तत्काळ जागेवरच महापालिकेकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया येत्या दोन दिवसांत पूर्ण करण्याची प्रशासनाची तयारी आहे. (प्रतिनिधी)
जागेचा ताबा घेताना व्हिडीओ चित्रीकरण
By admin | Published: January 14, 2015 11:41 PM