मुंबई/ नाशिक: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने मोठी तयारी सुरु केली आहे. याचपार्श्वभूमीवर मनसेप्रमुखराज ठाकरे (Raj Thackeray) आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी राज ठाकरे फक्त निवडक पदाधिकाऱ्यांशीच चर्चा करणार आहे. त्याचप्रमाणे राज ठाकरे नाशिकमध्ये एका विवाहसोहळ्याला हजेरी लावणार आहेत. भाजपाचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आप्तेष्टांचा हा विवाहसोहळा आहे.
राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाल्यावर त्यांचं स्वागत करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या परिसरात एकच गर्दी केली होती. राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी फुलाचा पुष्पगुच्छ घेऊन माजी महापौर अशोक मुर्तडक समोर आले होते. अशोक मुर्तडक यांनी तोंडावर एकावर एक असे दोन मास्क घातले होते. राज ठाकरे यांनी त्यांच्या तोंडावर दोन मास्क पाहिले आणि 'मास्कवर मास्क' असं विचारताच अशोक मुर्तडक यांनी मास्क बाजूला केले. त्यामुळे राज ठाकरेंची पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.
राज ठाकरेंना भेटायला आलेल्या नेते, कार्यकर्ते, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील विना मास्क उपस्थिती लावली. विनामास्क असणाऱ्या काही लोकांना हॉटेलच्या बाहेर काढलं. मात्र कोणतीही दंडात्मक कारवाई केली नसल्याची माहिती देखील समोर आली आहे. नाशिकमध्ये विना मास्क व्यक्तीला १ हजार दंड असल्याचा प्रशासनाचा नियम त्यामुळे राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यातही विना मास्क एंट्रीवर प्रशासन काय भूमिका घेणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
कोरोना काळात लोकांनी मास्क घालावे म्हणून प्रशासनाकडून नेहमी आवाहन करण्यात येते. परंतु राज ठाकरे यांनी आजपर्यंत कधीच मास्क घातला नाही. मंत्रालयात झालेल्या बैठकीवेळीही राज ठाकरेंनी मास्क घातला नाही. अनेकदा कृष्णकुंजवर लोकांनी गर्दी केली तेव्हाही राज ठाकरेंनी मास्क घातला नव्हता.
अलीकडेच मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला शिवाजी महाराज पार्क येथे मनसेकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हाही राज ठाकरेंनी मास्क घातला नव्हता. त्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारताच मी मास्क घालत नाही, तुम्हालाही सांगतोय असं म्हणत उत्तर दिलं होतं. इतकचं नव्हे तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावेळीही राज ठाकरेंनी मास्क घातला नव्हता.
अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
राज्यावरचं कोरोनाचं संकट अद्याप टळलं नाही, अलीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, अमरावती, अकोला, पुणे, अशा विविध भागात कोरोना वाढत आहे, प्रशासकीय पातळीवर बैठका सुरू आहेत, सगळ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत, मास्क लावणे, सुरक्षित अंतर पाळणं याचे नियम पाळलेच पाहिजे. काही नेते म्हणतात मी मास्क वापरत नाही, पण दुसऱ्यांना त्रास झाला तर त्याचं काय...एकेकाळी प्रविण दरेकरांचे ते नेते होते असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाव न घेता राज ठाकरेंना टोला लगावला.
मनसेनत इतर पक्षाच्या नेत्यांची इनकमिंग सुरु
गेल्या काही दिवसांपासून मनसेनत इतर पक्षाच्या नेत्यांची इनकमिंग सुरु आहे. काही दिवसांआधी नाशिकमधील शिक्षक समुदाय आणि मराठा मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती धरला. नाशिकमधील मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक (Ashok Murtadak) यांच्या नेतृत्वात काही शिक्षकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कृष्णकुंज निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला होता.