कळवण : कळवण- सुरगाणा विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या विधानसभा मतदारसंघात १४ अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक नेमण्यात आले आहेत.येथे मतदान संपेपर्यंत पूर्णवेळ व्हिडीओ शूटिंग केले जाणार असून अतिरिक्त फौजफाटाही तैनात ठेवण्यात आला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली.कळवण- सुरगाणा विधानसभा मतदारसंघात एकूण ३३८ मतदान केंदे्र आहेत. यामध्ये सुरगाणा तालुक्यातील १४ मतदान केंद्र अतिसंवेदनशील असल्याने निवडणूक आयोगाने या केंद्रावर सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक केली आहे. तसेच याशिवाय या ठिकाणी मतदानाच्या दिवशी पूर्णवेळ व्हिडीओ शूटिंग करण्यात येणार आहे. इतर ३४ मतदान केंद्रावर वेबकास्टींगची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून ३६ मतदान केंद्रावर व्हिडीओ ग्राफर नेमण्यात आले आहेत.मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी १५ आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यामध्ये दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर तसेच स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलिस शिपाई, एक होमगार्ड तसेच मतदार संघाकरिता एक सीआरपीएफ कंपनी तैनात करण्यात आली आहे. यामुळे या विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल, असेही त्यांनी सांगितले.
अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर व्हिडिओ शूटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 2:40 PM