नाशिक- शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम शेख यांच्याशी संबंधित असल्याचा गंभीर आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे नाशिकमधील राजकारण तापले आहे. या संदर्भातील व्हिडीओत दिसणाऱ्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने बडगुजर यांचे हेच का देशप्रेम आणि उबाठा गटाचे हेच का हिंदुत्व अशा आशाच्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत तसेच शिंदे गटाच्या वतीने भवानी चौकात निदर्शने करण्यात आली. मुंबई बॉम्ब स्फोटातील पॅरोल वर सुटलेला आरोपी सलीम शेख याच्या समवेत सुधाकर बडगुजर एका कार्यक्रमात गाण्यावर नाचताना दिसत असून सलीम याचे पुष्पगुच्छ देऊन ते स्वागत हे करीत आहेत असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
नितेश राणे यांनी या संदर्भात विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला त्यानंतर नाशिकमध्ये त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे बडगुजर हे देखील पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडणार आहेत.