नाशिक : रशियातील सोची शहरात सुरू असलेल्या बुद्धिबळाच्या फिडे वर्ल्ड कपमध्ये नाशिकचा ग्रॅन्डमास्टर विदित गुजराथी याला गुरुवारी रात्री झालेल्या सहाव्या फेरीतील म्हणजेच स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभवाचा सामना करावा लागला. पोलंडचा दिग्गज बुद्धीबळपटू जॅन क्रिस्तॉफ दुदाने दुसऱ्या सामन्यात विदितवर मात केल्याने विदितची या स्पर्धेतील दमदार वाटचाल खंडित झाली.
उपउपांत्यपूर्व फेरीतील दमदार विजयानंतर उपांत्यपूर्व फेरीत विदितचा सामना पोलंडच्या दुदाशी झाला. बुधवारी झालेल्या पहिल्या गेममध्ये पांढऱ्या सोंगट्यांसह खेळताना विदितने दुदाला सामना बरोबरीत सोडण्यास भाग पाडले होते, तर गुरुवारच्या दुसऱ्या सामन्यातही जवळपास अर्धा डाव म्हणजे २५ चालीपर्यंत विदितची बाजू वरचढ होती. मात्र, त्यानंतर दुदाने बाजी पलटवत विदितला अडचणीत आणले. अखेरीस पन्नासाव्या चालीनंतर विदितला पराभव मान्य करावा लागला. दुदाचे रेटिंग २७३७ तर विदितचे सध्याचे रेटिंग २७२६ इतके होते. तसेच दुदा हा काही काळापूर्वी अव्वल टॉप टेनमध्येदेखील होता. त्यामुळे या दिग्गज खेळाडूकडून झालेल्या पराभवातूनही शिकत विदित पुन्हा दमदार कामगिरी करेल, असा विश्वास विदितचे वडील डॉ. संतोष गुजराथी यांनी व्यक्त केला.
इन्फो
उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेला दुसरा भारतीय
फिडे वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत उपांत्यपूर्व फेरीत म्हणजे अव्वल ८ खेळाडूंमध्ये पोहोचण्याची किमया यापूर्वी भारताच्या एकमेव बुद्धिबळपटूला म्हणजेच माजी जगज्जेता विश्वनाथन आनंदलाच साधली होती. त्यापूर्वी किंवा त्यानंतरही कोणताही भारतीय बुद्धिबळपटू फिडे वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचू शकला नव्हता. त्यामुळे विदितने इथपर्यंत केलेली वाटचालदेखील नाशिकच नव्हे तर संपूर्ण देशवासीयांसाठी गौरवास्पद आहे.
फोटो
२९विदीत