नाशिक- येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापाठोपाठ नाशिक मध्ये २५ व २६ मार्च रोजी संवीधान सन्मानार्थ होणारे पंधरावे विद्रोही साहित्य संमेलन देखील स्थगित करण्यात आले आहे. आज नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
ज्या वेळी मराठी साहित्य संमेलन होते त्याच काळात अशाप्रकारे विद्रोही संमेलन घेण्याचा विद्रोही विचारवंतांचा प्रघात आहे. नाशिकमध्ये २६ ते २८ मार्च दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात घेण्याचे ठरल्यानंतर नाशिकमध्ये २५ व २६ मार्च दरम्यान केटीएचएम कॉलेजच्या प्रांगणात अशाप्रकारचे संमेलन घेण्याचे ठरवण्यात आले. त्याची तयारीही करण्यात आली. या संमेलनाच्य अध्यक्षपदी कोल्हापुर येथील आंतरराष्ट्रीय तुलनाकार डॉ. आनंद पाटील यांची निवड करण्यात आली होती. या संमेलनाची नाशिकमध्ये जोरदार तयारी सुरू होती.
नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोना बाधीतांची संख्या वाढली असल्याने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार काय या विषयी शंका उपस्थित केल्या जात होत्या, मात्र हे संमेलन स्थगित झाले तर विद्रोही संमेलन देखील स्थगित करण्यात येईल असे अगेादरच विद्रेाहीचे किशोर ढमाले यांनी सांगितले होते. अखेरीस कोरोना संसर्गामुळे हे संमेलन देखील स्थगित करण्याचा निर्णय आज दुपारी नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीस विद्रोही सांस्कृतीक चळवळीच्या राज्य अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी, कार्यकारी संघटक किशोर ढमाले, अर्जुन बागुल, नाशिक येथील संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशिकांत उन्हवणे, मुख्य संयोजक राजू देसले आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.