वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेरवळ येथील पाझरतलावाचा मुख्य बांध खचल्याने धोकादायक स्थितीत असलेल्या या पाझरतलाव क्षेत्रातील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, या पाझर तलाव बाबत इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी राहुल पाटील,तहसीलदार दीपक गिरासे तळ ठोकून आहेत; सांडव्यावाटे पाणी पातळी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.बेरवळ येथे सन १९८०-८१ च्या दरम्यान पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. सलग दोन वेळा या पाझर तलावाची लाखो रु पये खर्च करून दुरु स्ती करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच यावर्षी या पाझर तलावाच्या मुख्य बांधावर माती टाकण्यात आल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या संततधार पावसाने या पाझर तलावाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. पाझरतलावाच्या सांडीद्वारे पाण्याचा स्त्रोत मोठ्या प्रमाणात असूनही अखेर पाझर तलावाच्या मुख्य बांधावरील पाठीमागील बाजुतील माती खचल्याने तसेच आतून भागातून पाणी वाहू लागल्याने मागील भाग मोठ्या प्रमाणात खचला आहे. त्यामुळे पाझरतलाव परिक्षेत्रातील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.कारवाई होणार काय ?प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी या दुरवस्थेतील पाझर तलावाची तहसीलदार दीपक गिरासे,लपा विभागाचे अभियंता यांच्या समवेत पाहणी केली. या पाहणीत पाझरतलाव दुरु स्तीच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली. पाझर तलावाला पुढील आणि मागील बाजूस दगडाची पिचिंग नसल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार या पाझरतलावाची जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत दोन वेळा दुरूस्ती करण्यात आली आहे. मात्र ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांचे साटेलोटे असल्याने काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून संबंधित दोषींवर कारवाई होणार काय, असा प्रश्न सरपंच प्रकाश मौळे यांनी केला आहे.
बेरवळ बंधारा क्षेत्रात सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 4:45 PM
धोकादायक स्थितीत : निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी
ठळक मुद्देपाठीमागील बाजुतील माती खचल्याने तसेच आतून भागातून पाणी वाहू लागल्याने मागील भाग मोठ्या प्रमाणात खचला आहे.