नाशिक : शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.शनिवारी (दि़९) रात्रीपासून नाशिक शहर व धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. रविवारी (दि़१०) सकाळपासून गोदावरीच्या पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान नदीकिनारच्या परिसरात तैनात करण्यात आले आहे. याबरोबरच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील इतर भागातही पाऊस सुरू असून, नद्यांना पूर येण्याची शक्यता लक्षात घेता तालुका स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सोमवारी (दि़११) दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम, तर दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे़ त्यामुळे नागरिकांनी नदीकिनारी गर्दी करू नये, असे आवाहनदेखील जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात सर्वत्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
गोदाकाठलगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
By admin | Published: July 10, 2016 11:50 PM