नाशिक : जुने नाशिकमध्ये वाडा कोसळला असून पाच रहिवाशी ढीगाऱ्याखाली दाबले गेल्याची माहिती मिळताच पालकमंत्री गिरीष महाजन हे जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाड्याच्या ढीगा-याजवळ जाऊन बचावकार्य करणा-या पथकाला मार्गदर्शन करत हातभार लावला. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही मदतकार्यात सहभाग घेतला. यामुळे बचाव कार्यक करणा-या अग्निशामक दलाच्या पथकालाही अधिक प्रोत्साहन मिळाले.
यामुळे बचावकार्य करणा-या कर्मचा-यांना वरिष्ठ अधिका-यांकडून मार्गदर्शनही मिळाले आणि संबंधित सर्वांनी त्यांच्या मदतकार्याला हातभारही लावले. महाजन यांनी पेट्रोल कटर चालवून अडथळा दूर करण्याचा प्रयत्न केला. तसेच मुंढे यांनीही जवानांना मदत करत पहारीच्या सहाय्याने ढीगारा हटविण्यासाठी हातभार लावला. वाड्याचा मोठा भाग कोसळलेला असल्यामुळे ढीगा-याखाली अडकलेल्या सर्व रहिवाशांना बाहेर काढण्याचे मोठे आव्हान बचाव पथकापुढे होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास महाजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचल्याने त्यांना मार्गदर्शन लाभले आणि बचावकार्याला गतीमानता लाभून दिशाही मिळाली. बचावकार्य पूर्ण होईपर्यंत घटनास्थळी सर्व थांबून होते हे विशेष!