मनमाड : हावडा-मुंबई एक्स्प्रेसने आई वडिलांसोबत प्रवास करणाऱ्या एका तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न ड्युटीवर असलेल्या गार्डच्या सतर्कतेमुळे फसला आहे. मनमाड रेल्वे स्थानकावर सापळा रचून अपहरणकर्त्या महिलेला ताब्यात घेण्यात आले तर अपहरण झालेली मुलगी आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आली आहे.
महाराष्ट्र एक्स्प्रेस गाडीवर गार्डची ड्युटी करून गार्ड सर्वेश यादव हे न्यायडोंगरी रेल्वे स्थानकावर उतरले होते. याच दरम्यान फलाटावर उभे असतांना स्टार्टर सिग्नल फेल झाल्यामुळे गाड्या आहे त्याच रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्या होत्या. त्याच वेळी न्यायडोंगरी रेल्वे स्थानकावर थांबलेल्या हावडा-मुंबई एक्स्प्रेसमधून एक महिला एका तीन वर्षीय मुलीला घेऊन खाली उतरली. बाजूलाच उभ्या असलेल्या सचखंड एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचमध्ये ही महिला जाऊन बसली. गाडीने रेल्वे स्थानक सोडले असता त्याच वेळी जगलाल पारो (वय ३७) हे प्रवास करत असतांना त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती गार्ड यादव यांना मिळाली. त्यांनी तत्काळ ही माहिती मनमाड-नांदगाव येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन गाडी आणि डब्याचे लोकेशन कळविले. महिलेचा काढलेला फोटो पाठविला. रेल्वे पोलीस आणि सुरक्षा बल जवानांनी मिळालेल्या माहितीनुसार तत्काळ सापळा रचत सदर अपहरणकर्त्या महिलेला ताब्यात घेतले आणि मुलीला तिच्या वडिलांच्या स्वाधीन केले.
इन्फो
फोटो ठरला उपयुक्त
सदर महिलेजवळ कोणतेच साहित्य नव्हते आणि ती एसी कोच मधून उतरत असतांनाच गार्ड सर्वेश यादव यांना संशय आला. त्यांनी लगेच त्या महिलेजवळ जात तिची विचारपूस केली. तुझे पती कुठे आहे, सामान कुठे आहे असे विचारत असतांनाच तिने एका वृद्ध व्यक्तीकडे हात दाखवत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र हाताला धरलेली मुलगी रडत असल्यामुळे गार्ड यादव यास आणखी संशय बळावल्यामुळे त्यांनी त्या महिलेचा आणि लहान मुलीचा फोटो काढून घेतला. हाच फोटो पुढे सदर महिलेला ओळखण्यासाठी उपयुक्त ठरला.