प्रवीण आडके, नाशिक लोकसभेच्या नाशिक मतदारसंघासाठी शिवसेनेच्या ठाकरे घटनेच्या वतीने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना आज उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. यापूर्वी पक्षाचे लोकसभा प्रमुख विजय करंजकर यांना उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले होते.मात्र ऐनवेळी उमेदवारी फिरवल्याने नाराज झालेल्या करंजकर समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली आहे. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची असा निर्धार त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान यासंदर्भात दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेऊन करंजकर आपली भूमिका मांडणार आहेत.विजय करंजकर हे जुने शिवसैनिक असून ते जिल्हाप्रमुख होते अलीकडेच त्यांची लोकसभा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट होते मात्र ती यादी राज्यपालांनी मान्य न केल्यामुळे त्यांची संधी हुकली होती. त्यामुळे नाशिकच्या लोकसभेसाठी त्यांनाच उमेदवारी देण्यात येणार असे सांगितले जात होते.
मध्यंतरी त्यांना मातोश्रीवर बोलवून कामाला लागण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी प्रचार सुरू केला होता मात्र दोन दिवसांपासून त्यांच्या ऐवजी पर्यायी उमेदवार म्हणून अन्य व्यक्तींचा शोध सुरू झाला आणि सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या पर्यँत येऊन ठेपला आज अधिकृतरित्या राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर सकाळीच भगूर येथील करंजकर यांच्या निवासस्थानी त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली आहे आज नुकत्याच झालेल्या छोटेखानी सभेमध्ये काहीही झाले तरी करंजकर यांनी निवडणूक लढवावी असे मत समर्थकांनी मांडले. अर्थात या संदर्भात दुपारी एक वाजता करंजकर पत्रकार परिषद घेणार असून त्यात आपली भूमिका ते स्पष्ट करणार आहेत.