संदीप झिरवाळ ।पंचवटी : गेल्या पंधरवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले असून, त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत कोथिंबीरच्या बाजारभावाने उच्चांक गाठला. शनिवारी (दि.२१) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर २० हजार रुपये शेकडा दराने विक्री झाली. मात्र रविवारी (दि. २२) आजवरच्या दरांमध्ये सर्वांत उच्चांकी म्हणजे २७ हजार ५११ रुपये शेकडा जुडी असा भाव मिळाला आहे. सलग चार दिवसांपासून कोथिंबीरचे बाजारभाव गगनाला भिडले असल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी मात्र पळाले आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने शेतातील उभे पीक नष्ट झाले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका कोथिंबीरच्या उत्पादनाला बसला आहे. त्यामुळे नाशिक बाजार समितीत आवक घटली आहे. त्याचा परिणाम बाजारभावावर झाला. गुरुवारी (दि.१९) कोथिंबिरीची १८ हजार रु पये शेकडा दराने विक्री झाली होती, तर शुक्र वारी दर तेजीतच असल्याने १९ हजार रुपये शेकडा दर मिळाला होता. शनिवारी (दि.२१) कोथिंबीर बाजारभावाने चालू वर्षाचा उच्चांक मोडला. शनिवारच्या दिवशी कोथिंबीर तब्बल २० हजार रुपये शेकडा म्हणजेच २०० रुपये प्रतिजुडी दराने विक्र ी झाली. इतरवेळी साठ ते सत्तर हजार कोथिंबीर जुडीची आवक व्हायची तेथे आता सात ते आठ हजार जुड्यांची आवक होत आहे. बाजार समितीत दिंडोरी, कळवण तसेच सिन्नर तालुका व जवळपासच्या आदिवासी भागातून आवक होत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सिन्नर तालुक्यातील ठाणगाव पाडळी येथील शेतकरी दुर्गेश रेवगडे यांनी शिवांजली व्हेजिटेबल कंपनीत आणलेली कोथिंबीर छोटू चव्हाण या व्यापाºयाने २० हजार रुपये शेकडा दराने खरेदी केली. गेल्या महिनाभरापासून कोथिंबीरचे बाजारभाव तेजीतच असल्याने तसेच ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांना कोथिंबीरच्या चार काड्या खरेदीसाठी कमीत कमी दहा रुपये मोजावे लागत आहेत.
कोथिंबिरीने गाठला विक्रमी भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:34 AM