नाशिक : आठ दिवसांपूर्वी ओझर येथील नाशिक विमानतळावर साग्रसंगीत पार्टी केल्याप्रकरणी अटक केलेले हर्ष कन्स्ट्रक्शनचे संचालक विलास बिरारी यांना पोलीस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मात्र, त्यांनतर विलास बिरारी यांच्या वतीने जामिनासाठी अर्ज करण्यात आल्यानंतर त्यांना १५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी त्यांची दिंडोरी पोलीस ठाण्यातून सुटका झाल्याचे समजते. ओझर येथील नाशिक विमानतळावर साग्रसंगीत पार्टी केल्याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी या पार्टीची परवानगी घेणारे हर्ष कन्स्ट्रक्शनचे संचालक विलास बिरारी यांच्यासह आॅकेस्ट्रा संचालक सुनील ढगे, बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया नाशिक शाखेचे सर्व पदाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, डिंगोरे मंडप डेकोरेटर्स आदि विरोधात सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी तसेच विनापरवाना जादा वेळ डिजे वाजवून गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात सुनील ढगे यांना बुधवारी पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. तर गुरुवारी (दि.५) याप्रकरणाचे प्रमुख सूत्रधार ठरविलेल्या विलास बिरारी यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शाहीन गडकरी यांनी ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. काल (दि.७) कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी विलास बिरारी यांना न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जी.आर. तौर यांनी १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर बिरारी यांच्या वतीने अॅड. भानोसे, अॅड. वाघ यांनी जामिनासाठी युक्तिवाद केला.
विलास बिरारींची जामिनावर सुटका ओझर पार्टी, १५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर
By admin | Published: February 08, 2015 12:41 AM