सिडको : विल्होळी गावाच्या प्रवेशद्वारासह मुख्य रस्ते, चौक, मंदिर व परिसरात नुकतेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे गावातील चोऱ्या तसेच इतर घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाजीराव गायकवाड होते.मुंबई महामार्गालगत जैन मंदिरासमोर असलेल्या विल्होळी गावात सुमारे दहा ते पंधरा हजारांची वस्ती आहे. या गावात गेल्या काही दिवसांत चोऱ्या, घरफोड्यांचे प्रकार वाढत असल्याने याबाबत उपाययोजना करावी यासाठी गावकऱ्यांनी विल्होळीचे सरपंच बाजीराव गायकवाड यांची भेट घेतली. यानंतर गायकवाड यांनी ग्रामपंचायतीच्या निधीतून गावातील मारु ती मंदिर व परिसर, प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, पाणीपुरवठा जलकुंभ, ग्रामपंचायत कार्यालय व परिसर तसेच गावात प्रवेश करणारे रस्ते, अंतर्गत रस्ते इत्यादी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. तसेच व्यावसायिक प्रतिष्ठानचे व्यवस्थापक व मालक यांना विनंती करून त्यांच्या व्यावसायिक आस्थापनांतदेखील सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण विल्होळी गावच कॅमेऱ्यांच्या नजरेत आले आहे. याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी बळीराम पगार, सरपंच संजय गायकवाड, नामदेव भावनाथ, पूजा निंबेकर, सुरेश भावनाथ, ताराबाई वाघ, सोमनाथ वाघ, सुरेखा गायकवाड, संतोष अल्हाट, संपत बोंबले, सावळीराम डांगे, कैलास भावनाथ यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
विल्होळीगाव सीसीटीव्हीच्या कवेत
By admin | Published: August 30, 2016 1:20 AM