विल्होळी : विल्होळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत हळूहळू पाय रोवू पाहणाऱ्या भंगार बाजारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा तसेच पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून भंगार बाजारातील दुकानांना तत्काळ नोटिसा देऊन त्या हटविण्याचे तसेच यापुढे भंगार दुकानदारांना ग्रामपंचायतीने परवानगी देऊ नये, असा ठराव एकमताने करण्यात आला. विल्होळी येथे १५ आॅगस्टचे औचित्य साधून ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच बाजीराव गायकवाड यांची निवड करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेेत गावातील नळांना पाणीमीटर बसविणे, गाव या हद्दीतील भंगार दुकानदारांना ग्रामपंचायतीने परवानगी देऊ नये तसेच यापुढे ना हरकत दाखले देऊ नये. सध्या असलेल्या दुकानांना त्वरित खाली करण्यास लावणे, या विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच ग्रामस्थांना प्लॅस्टिक वापरावर सविस्तर माहिती देण्यात आली, कोणत्या प्रकारचे प्लॅस्टिक वापरता य ेईल आणि कोणते वापरता येणार नाही याबाबत शासनाच्या राजपत्राचे वाचन करून नागरिकांना प्लॅस्टिक न वापरण्याचे आवाहन करण्यात आले. मराठा समाजाला तत्काळ आरक्षण लागू करण्याचा ठरावही एकमताने मंजूर करण्यात आला.या ग्रामसभेत शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. रोजगार हमी योजना कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली. तसेच तंटामुक्ती अभियान समिती स्थापन करण्यात आली. अपंग कल्याण, महिला बालकल्याण, समाज कल्याण अंतर्गत घ्यावयाच्या योजनांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक बळीराम पगार, तलाठी दत्तात्रेय चोळके, कृषी सहायक पी. बी. पाटील, उपसरपंच श्रीकृष्ण मते यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, वैद्यकीय सेविका, शिक्षक, सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
विल्होळी ग्रामसभेत भंगार बाजाराचा प्रश्न गाजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:40 AM