नाशिक जिल्हा मार्च, २०१८ मध्ये हागणदारीमुक्त घोषित झाला असून, पायाभूत सर्वेक्षणानुसार कुटुंबांकडे शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियान टप्पा दोनअंतर्गत शौचालयांचा नियमित वापर व्हावा, नादुरुस्त शौचालय दुरुस्त व्हावीत, गावातील व परिसराची स्वच्छता राहावी, यासाठी सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनासह शाश्वत स्वच्छतेवर काम करण्यात येत आहे. याच अनुषंगाने केंद्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात १ सप्टेंबर ते १५ ऑगस्ट, २०२२ या दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सत्याग्रह से स्वच्छतागृहांतर्गत गावांचा हागणदारीमुक्त ग्रामपंचायतींचा दर्जा कायम ठेवून, त्यात सातत्य राखण्याच्या दृष्टीने हागणदारीमुक्त अधिक ओडीएफ प्लस हा उपक्रम राबवून, १५ ऑगस्ट, २०२२ पर्यंत जिल्ह्यातील जास्तीतजास्त ग्रामपंचायती टप्प्याटप्प्याने हागणदारीमुक्त अधिक घोषित करावयाच्या आहेत. २ ऑक्टोबर रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये ‘स्वच्छ भारत दिवस’ साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी दिली.